मुंबई : देशात खूप कमी नेते आहेत ज्यांनी एखाद्या राज्यात मोठा काळ राज्य केलं. मात्र, अशी यादी काढायची झाली तर सर्वात प्रथम नाव येतं ते पश्चिम बंगालचे दिवंगत माजी मुख्यमंत्री ज्योति बसु (Jyoti Basu) यांचं. ज्योति बसु हे 1977 ते 2000 पर्यंत पश्चिम बंगालचे (West Bengal) मुख्यमंत्री (Chief Minister) राहिले. 23 जानेवारी म्हणजे आज ज्योति बसु यांची पुण्यतिथी आहे. अशावेळी त्यांची आठवण येणं आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणांची उजळणी करणं स्वाभाविक आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वेळ अशी आली होती की ज्योति बसु पंतप्रधानपदाच्या खूप जवळ पोहोचले होते.
पश्चिम बंगालसाठी ज्योति बसु यांचं काम खूप मोठं आहे. तसंच त्यांच्या टीकाकारांचीही कमी नाही. त्यांच्याच काळात बंगालमध्ये जमीन सुधारणा झाली. मात्र, त्यांच्यावरील मोठा आरोप हा आहे की त्यांनी प्रदेशातील उद्योगनगरी संपुष्टात आणली. सोबतच ते राज्याचा विकास करण्यात कमी पडले. आपल्या कम्युनिस्ट विचारसरणीमुळे ते बंगालसाठी जे करु शकले असते, ते त्यांनी केलं नाही.
ज्योति बसु
ज्योति बसु यांच्याकडे पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी आली होती. मात्र, त्यांच्या पक्षाने ते होऊ दिलं नाही! 1966 मध्ये 11 व्या लोकसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. मात्र सत्तास्थापनेसाठी त्यांना अन्य पक्षांची साथ मिळाली नाही. अशावेळी काँग्रेस आणि अन्य पक्ष मिळून सरकार बनवू शकत होते. काँग्रेसनं तिसऱ्या आघाडीला आपला पाठिंबा देण्याची घोषणाही केली. अशावेळी ज्योति बसु यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनण्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.
मात्र, त्यावेळी ज्योति बसु यांच्या नेतृत्वात सरकार न बनण्याचं कारण एखादा पक्षाने शब्द फिरवणं किंवा संख्याबळ नव्हतं. सर्वजण तयार होते. मात्र, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने असं सरकार स्थापन्याला नकार दिला. त्याचं एक प्रमुख कारण होतं की, त्यांना सरकार स्थापन केल्यानंतर उदारीकरणातील आर्थिक धोरण पुढे घेऊन जावं लागलं असतं, ज्याला त्यांनी मागील सरकारच्या काळात विरोध केला होता. त्यावेळी कम्युनिस्ट पक्ष आपल्या विचारांपासून किंवा धेय्यधोरणांपासून बाजूला ठेवण्यास तयार नव्हता.
ज्योति बसु
सर्वात महत्वाची बाब म्हणजे याबाबत ज्योति बसु यांनी कधीही सार्वजनिक किंवा खासगीरित्या याबाबत आपली भूमिका मांडली नाही. त्यांनी आपल्या साधेपणाची आणि पक्षावरील निष्ठेची प्रतिमा कधीही डागाळू दिली नाही. त्यांच्या साधेपणाचा दाखला द्यायचा झाल्यास ते आपल्याला आमदार म्हणून मिळणाऱ्या अडीचशे रुपयांपैकी बहुतांश पैसे पक्ष कामासाठी देत. त्यांचा आहारही अगदी साधा होता. त्यात डाळ भात आणि तळलेल्या वांग्यांचा समावेश असायचा. असंही म्हटलं जातं की ज्योति बसु यांनी वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्यांदा चहा घेतला होता.
ज्योति बसु हे एका चांगल्या आणि उच्च मध्यमवर्गीय परिवारातील होते. त्यांचे वडील एक डॉक्टर होते. त्यांचे शिक्षण कोलकातामधील सर्वात नावाजलेल्या लोरेटो या शाळेत झाले. पुढे त्यांनी कोलकात्यातीलच प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तिथेच ते कम्युनिस्ट विचारसरणीशी जोडले गेले होते.
इतर बातम्या :