Jyoti Malhotra : ज्योतीने केलं डेव्हिड हेडलीसारखं कांड ? पहलगाम मध्ये दिसला मुंबई हल्ल्याचा पॅटर्न ?
Jyoti Malhotra News: भारतात राहून पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावरील संशयाची सुई अधिकच मजबूत होत चालली आहे. तपास संस्थांकडून तिच्या पहलगाम भेटीचा आणि पाकिस्तान कनेक्शनचा तपास केला जात आहे. पहलगाम हल्ल्यापूर्वी तिने रेकी केल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. तिच्याबद्दल आता दररोज नवीन खुलासे होत आहेत. तपास यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या ज्योतीवर प्रश्नांचा भडिमार करण्यात येत आहे. तिच्याविरुद्ध हेरगिरीचे पुरावे गोळा केले जात आहेत. ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे की नाही याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्राबद्दल केलेल्या दाव्यांमुळे मुंबई हल्ल्याच्या आणि दहशतवादी डेव्हिड हेडलीच्या काही आठवणी जाग्या झाल्या आहेत. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी डेव्हिड हेडलीने मुंबईला अनेकवेळा भेट दिली होती. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तीन महिने आधी युट्यूबर ज्योती मल्होत्रा देखील पहलगामला गेली होती, असा दावा करण्यात येत आहे.
खरंतर, ज्योती मल्होत्रा अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. तिला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी वागणूकही मिळाली. एवढेच नाही तर तिने एकदा चीनलाही भेट दिली होती. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यापूर्वी तिने पाकिस्तान आणि पहलगाम दोन्ही ठिकाणी भेट दिली होती. पहलगाम हल्ल्याच्या तीन महिने आधी, 25 जानेवारी रोजी ज्योती जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये होती. ज्योती मल्होत्राने पहलगाममधील वेगवेगळ्या ठिकाणांचे अनेक व्हिडिओ बनवले होते, असे समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्यावरून शंका



पहलगाममधील ज्योतीच्या त्या व्हिडिओंबद्दल, असा दावा केला जात आहे की ज्योती मल्होत्राने त्या व्हिडिओंद्वारे पाकिस्तानला तेथील विविध स्थानांची आणि ठिकाणाची माहिती दिली. दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ज्योतीने रेकी केल्याचा आरोप आहे. मात्र या संदर्भात अजूनही तपास सुरू आहे. हे अगदी असेच आहे, जसे डेव्हिड हेडलीने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी केले होते. नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ला होण्यापूर्वी हेडलीने अनेकदा मुंबईला भेट दिली होती. त्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केली होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने खरोखरच रेकी केली होती असे तपासात आढळलं तर पहलगाम हल्ला हाही मुंबई हल्लाच्या पॅटर्नप्रमाणेच होता, हे स्पष्ट होऊ शकेल.
ज्योतीची तुलना डेव्हिड हेडलीशी का ?
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी आरोपी डेव्हिड कोलमन हेडली 26/11 पूर्वी अनेक वेळा भारतात आला होता. तो भारतात आला आणि मुंबईतील अनेक लक्ष्यित (targeted areas) ठिकाणाचे फोटो काढले. त्या फोटोच्या आणि त्याने दिलेल्या ठिकाणाच्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर मुंबईत झालेला नरसंहार संपूर्ण जगाने पाहिला. त्याचप्रमाणे, असे म्हटले जात आहे की पाकसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा पहलगामला गेली आणि प्रत्येक क्षेत्र, स्थान आणि मार्गाचे वर्णन करणारा एक तपशीलवार ब्लॉग तयार केला. त्यामुळे पहलगाम हल्ला त्या व्हिडिओच्या आधारे झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तपास पूर्ण झाल्यावरच खरं काय ते कळू शकेल.
ज्योतीच्या व्हिडिओमुळे उद्भवणारे प्रश्न
पाकिस्तानी एजंट्सच्या सूचनेवरून ज्योती मल्होत्राने अनेक व्हिडिओ बनवल्याचा दावाही केला जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतरचा तिचा व्हिडिओ याच अँगलने पाहिला जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या व्हिडिओमध्ये ज्योतीने पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांची निंदा केली नाही तर तिने सुरक्षा दलांना आणि पर्यटकांना जबाबदार धरले, त्या व्हिडीओत ते स्पष्टपणे दिसलं. ज्योतीने पाकिस्तानी एजंटांच्या सूचनेवरून भारताविरुद्ध प्रचार व्हिडिओ बनवले होते,असा दावाही केला जातोय.