भविष्य खरं ठरलं नाही तर माझा चेहरा शेणाने भरेल; प्रशांत किशोर यांच्या दाव्याने एकच खळबळ

Prashant Kishor Prediction : राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल 4 जून रोजी जाहीर होईल. त्यापूर्वी किशोर यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. काय म्हणाले ते...

भविष्य खरं ठरलं नाही तर माझा चेहरा शेणाने भरेल; प्रशांत किशोर यांच्या दाव्याने एकच खळबळ
Prashant Kishor Prediction
| Updated on: May 21, 2024 | 10:06 AM

राजकीय विश्लेषक, रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणूक 2024 आणि आंध्र प्रदेश विधानसभेबाबत त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत किती जागा मिळतील याविषयी मोठा दावा केला आहे. तर एक भाकित खोटं ठरल्यास तोंडाला शेण लावण्याची तयारी पण त्यांनी दाखवली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनेक मुद्यांना घातला हात

प्रशांत किशोर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? या प्रश्नावर त्यांनी तात्काळ उत्तर दिले, हो, ते पंतप्रधान होतील. पण त्याच वेळी त्यांनी एक जोरदार वक्तव्य केले. हे असे आहे की, तुम्ही शतक ठोकले. एक शतक कोणत्याही दबावाविना, बिनधास्त केले. तर दुसरे शतक 6 झेल सुटल्यानंतर केले, असा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

मग भाजपच्या पारड्यात किती जागा?

भाजपला गेल्यावेळी 303 जागा मिळाल्या होत्या. मग यावेळी त्यांच्या पारड्यात किती जागा पडतील. त्याचे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपची कामगिरी दमदार असेल. भाजपला 303 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेठीतील बदल चुकीचा की बरोबर?

या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले की, त्याठिकाणी प्रियंका गांधी यांना उमेदवारी द्यायला हवी होती. राहुल गांधी यांनी ही जागा लढवणे आवश्यक होते. मला वाटतं ज्याच्यावर विश्वास आहे, त्याला उमेदवार करणे गैर नाही.

आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डींचा पराभव?

आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डींचा पराभव होणार का? या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. जर निकालात जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर प्रशांत किशोर यांच्या चेहऱ्यावर शेण पडेल. जर मी म्हणेल ते खरं असेल तर जगन मोहन रेड्डी यांच्या तोंडावर शेण पडो.