Maharashtra News LIVE : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे की नाही हे ज्येष्ठ नेतेच ठरवतील – मंत्री हसन मुश्रीफ
Maharashtra News LIVE Updates: महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक आज मंजूरीसाठी संसदेत असेल. त्यावर आज सायंकाळी 4 वाजता मतदान होईल. त्यासोबतच देशातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयकही कनिष्ठ सभागृहासमोर सादर करण्यात येईल.

महिलांना विधीमंडळात आणि संसदेत 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. हे विधेयक जनगणनेनंतर सादर करण्याची मागणी विरोधकांची आहे. तर केंद्र सरकार ते आताच रेटत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्र सरकार हे विधेयक मंजूर करू इच्छित असल्याचा आणि सरकारचा हेतू योग्य नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासोबतच विधीमंडळ आणि संसदेतील खासदार आणि आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे परिसीमन विधेयकही सादर होणार आहे. तर नाशिकमधील आयटी कंपनीतील कारनामे एकमागून एक समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पश्चिम बंगालच्या रणधुमाळीत उतरले आहेत. तर राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत प्रचार सुरू आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाचा
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. यामुळे दुपारच्या सुमारास अनेक रस्ते निर्मनुष्य झाल्याचे बघायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात तापमान आणखी वाढवण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
-
रत्नागिरीत उद्या कोकणातल्या शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरीत उद्या कोकणातल्या शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी खासदार विनायक राऊत या सभेला उपस्थित राहणार आहेत.
-
-
सोलापूर-धुळे महामार्गावर धाराशिवजवळ अपघात, महिला जागीच ठार
सोलापूर-धुळे महामार्गावर धाराशिवजवळ झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. स्कुटी गाडीवरून पडल्यानंतर महिलेच्या अंगावरून मालवाहतूक गाडी गेली. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील पती-पत्नी स्कुटी वर जात असताना हा अपघात झाला आहे.
-
बुलढाणा : सहाय्यक महसूल अधिकारी लाच घेताना सापडला
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत सहाय्यक महसूल अधिकारी कैलास भगवान मुरकुट यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार हे पेशाने वकील असून त्यांच्या नातलगाच्या जमिनीच्या फेरफार प्रकरणातील अंतिम आदेशाची मूळ प्रत देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशीम पथकाने सापळा रचून अधिकाऱ्याला पकडले.
-
चंद्रपूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती काँग्रेसच्या नगरसेवक संगीता भोयर विजयी
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदावर काँग्रेसच्या नगरसेवक संगीता भोयर यांचा विजय झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका डीलन केळझरकर मतदानाला अनुपस्थित राहिल्याने भाजप उमेदवार सुनिता जयस्वाल यांचा एका मताने पराभव झाला आहे. 12 सदस्यीय महिला आणि बालकल्याण समितीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडे होती समसमान 6-6 मते होती. डीलन केळझरकर यांनी जर भाजप उमेदवाराला मतदान केले असते तर ईश्वर चिट्ठीने निकाल होऊ शकला असता असे म्हटले जात आहे.
-
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात आठव्या आरोपीला अटक
नेस्को ड्रग्स प्रकरणात आणखी एका फरार आरोपीला अटक झाली आहे. त्याचे नाव शुभ अग्रवाल असून त्याला मुंबईच्या दादर भागात अटक झाली आहे. शुभ अग्रवाल हा 22 वर्षांचा असून मुंबईतील अंधेरी भागातील कॉलेजचा विद्यार्थी आहे. शुभ अग्रवाल याने प्रतीक पांडे याच्याकडे अमलीपदार्थ डिलिव्हर केले होते. त्याला बोरिवली कोर्टात हजर केले आहे.
-
मस्साजोग ग्रामपंचायत बिनविरोध होणार नाही, 28 तारखेला मतदान
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली आहे. हे निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती. मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांच्या नंतर अर्ज दाखल केला. एकूण पाच अर्ज दाखल झाले होते,मात्र यातील तिघांनी आपले अर्ज मागे घेतले. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज घेण्यासाठी मुदत होती.
स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही, यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 28 तारखेला मतदान आणि 29 तारखेला निकाल येणार आहे. यामुळे 29 तारखेलाच मस्साजोग गावचे सरपंच कोण हे स्पष्ट होईल. -
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे की नाही हे ज्येष्ठ नेतेच ठरवतील – मंत्री हसन मुश्रीफ
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावचं की नाही हे पवार कुटुंबांनी ठरवावं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे हे वैयक्तिक इच्छा पेक्षा पवार कुटुंबांना काय वाटतं हे महत्त्वाचे आहे असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
-
भोंदू अशोक खरातच्या ओकस कार्यालयाची ईडीकडून तपासणी
भोंदू अशोक खरातच्या ओकस कार्यालयाची ईडीकडून तपासणी
ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स नावाने होते भोंदू अशोक खरात याचे कार्यालय
या कार्यालयात काही जमिनींचे मालमत्तांचे व्यवहार झाल्याचे समोर
इडीकडून कार्यालयाची कसून तपासणी
-
नागपुरात बर्निंग कारचा थरार
नागपुरात बर्निंग कारचा थरार
महाल परिसरातील झेंडा चौकात अचानक लागली मारोती इको कारला आग
आगीत कार जळून खाक, कोणतीही जीवितहानी नाही
कारला आग लागल्याचं कळताच सर्व खाली उतरले
सुदैवानं मोठी दुर्घटना टळली, कारमधील सर्वजण सुखरूप
-
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण
सोन्याच्या दरात 1 हजार 600 रूपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 251 रुपयांवर
तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 60 हजार 590 रुपयांवर
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा
-
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी बीड शहरात महामोर्चा
बीड शहरात मुस्लिम समाजाने पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी महामोर्चा काढला आहे. या मोर्चाला किल्ला मैदानापासून सुरुवात झाली असून, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. SEBC प्रवर्गातील 5 टक्के आरक्षण मिळावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
-
मुंबईच्या ताडदेव परिसरातील साईलीला इमारतीमध्ये आग
मुंबईच्या ताडदेव परिसरातील साईलीला इमारतीमध्ये आग….आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट….आगीमध्ये अडकलेल्या एका महिलेला सुखरुप बाहेर काढलं
-
परळी : विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वे पोलीस जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
परळीमध्ये विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वे पोलीस जवानाची गळफास लावून आत्महत्या… नितीन यांचा विवाह अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता… आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट…
-
मविआनं चांगला निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध-बावनकुळे
विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल… लवकरच भूमिका ठरवू, संजय राऊतांचं भाष्य… तर मविआनं चांगला निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध, चंद्रशेखर बावनकुळेंचही समर्थन…
-
ठाकरे मैदानात उतरल्यास वि.परिषद बिनविरोधाची शक्यता
उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधानपरिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता… ठाकरेंना पवारांसह काँग्रेसचाही पाठिंबा… मात्र स्वतः निवडणूक न लढण्याची ठाकरेंची भूमिका… ठाकरेंच्या उमेदवारीवर निवडणुकीचा निकाल ठरणार…
-
खरातच्या ट्रस्टच्या उपाध्यक्षाचं अपघाती निधन
भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षाचं अपघातात निधन… जितेंद्र शेळकेंचा भीषण अपघातात मृत्यू… समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना भीषण अपघात…
-
अमरावती मध्ये कोल्हे प्रकरण झालं, तेव्हा कूठ गेले होते प्यारे खान? – नवनीत राणा
“नाशिक मध्ये आमच्या मुलींना बीफ दिलं, बुरखा घालायला लावला, अमरावती मध्ये कोल्हे प्रकरण झालं, तेव्हा कूठ गेले होते प्यारे खान?. राज्यात लव जिहाद होत आहे, तेव्हा प्यारे खान कुठे जातात. आमच्या मुलीशी लग्न केलं जातं तेव्हा प्यारे खान खान कुठं जातो?. प्यारे खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आम्ही हिंदुंच्या बाजूने आहोत” असं नवनीत राणा म्हणाल्या.
-
सिंधुदुर्गात गॅस बुकिंगचा बोजवारा; ग्राहक हवालदिल
सिंधुदुर्गात गॅस कंपनीकडून कन्फर्मेशन मेसेज आणि डीएससी नंबर न मिळाल्याने बुकिंग खोळंबले…..कडक निर्बंधांमुळे घरगुती पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप…
-
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन
भोंदू बाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. अपघातात दुर्देवी मृत्यू. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ अपघात. उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक. कार थेट कंटेनरखाली घुसली. अपघातात जितेंद्र शेळकेंचा मृत्यू तर पत्नी आणी मुलगा गंभीर जखमी.
-
वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली
वाल्मीक कराडच्या तपासणीला सुरुवात. सिटीस्कॅन रूम मध्ये नेलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीला सुरुवात.
-
अशोक खरात प्रकरणात दिपक लोंढेची कसून चौकशी, दिपक केसरकर यांचा निकटवर्तीय
दिपक लोंढेची तीन तासापासून चौकशी सुरू. भोंदू अशोक खरात प्रकरणात लोंढे शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर. दिपक लोंढे अशोक खरातसह दिपक केसरकर यांचा निकटवर्तीय. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दिपक लोंढे आणि पत्नीच्या नावे चार खाती. खात्यांवरून कोट्यवधींच्या व्यवहार. शिर्डी पोलिसांकडून दिपक लोंढेंची चौकशी सुरू. लोंढे यांच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे लक्ष.
-
ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलेचा राडा
ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलेचा राडा पहायला मिळाला. गर्दीत “बाजूला सरक” बोलण्यावरून महिला संतापली आणि त्या महिलेने दुसऱ्या महिलेला बेदम मारहाण केली. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्टेशन दरम्यान हा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
-
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 20 एप्रिल रोज आपली भूमिका जाहीर करणार
शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 20 एप्रिल रोज आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्राजक्त तनपुरे निर्णय जाहीर करणार आहेत. तनपुरे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे वीस तारखेला कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर माझी भूमिका मी सहा तारखेला स्पष्ट केली होती, मात्र आमचे काही कार्यकर्ते नाराज आहे, त्यामुळे मेळावा घेऊन पुन्हा भूमिका स्पष्ट करणार असं तनपुरे म्हणाले.
-
धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर
धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंश डिग्री सेल्सिअसवर गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिक कुलर आणि थंड पेयाचा आसरा घेत असल्याचं दिसत आहे.
-
वाढत्या लव्ह- जिहाद प्रकरणाविरोधात बजरंग दलाचं आंदोलन
नाशिक इथल्या टीसीएस या कंपनीत घडलेल्या प्रकाराविरोधात आणि राज्यातील इतर वाढत्या लव्ह- जिहाद प्रकरणाविरोधात आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंबईसह राज्यातील विविध भागात बजरंग दलाच्या वतीने आज आंदोलन करण्यात येणार आहे. वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या वतीने आंदोलन सुरू आहे.
-
नाशिक – ED टीम अशोक खरातच्या कार्यालयात दाखल, चौकशी सुरू
नाशिक – भोंदू बाबा अशोक खरातच्या (okas) ओकस कार्यालयात EDची टीम दाखल झाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण प्रकरण तसेच फसवणुकीच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे.
-
अमरावती – परतवाडा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणातील आरोपीसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलिसांचं होणार निलंबन ?
अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण गाजत आहे. या केसमधील आरोपी अयान सोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
एका व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी हे अयान अहमद याला केक भरवताना दिसले होते. त्यांचं आता निलंबन होऊ शकतं. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना अमरावतीच्या पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. केक भरवतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची अधिक चौकशी होणार असून त्यांच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, बालविवाह रोखण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. 19 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होत असल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागांत बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
-
बीड – मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का ? अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख
बीड – मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीखआहे, निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उमदेवारांना आज दुपारी 3 नंतर या निवडणुकीसाठी चिन्हाचे वाटप देखील केलं जाणार आहे.
-
अशोक खरातच्या अटकेला एक महिना पूर्ण; उद्या नाशिक सत्र न्यायालयात होणार सुनावणी
भोंदू अशोक खरात याला अटक होऊन आज एक महिना पूर्ण झाला असून, आता त्याच्या चौकशीला एसआयटीने (SIT) अधिक गती दिली आहे. अशोक खरात याला उद्या नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशी पूर्ण करण्यावर एसआयटीचा भर आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उद्याच्या न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
अहिल्यानगरमध्ये उन्हाचा पारा 41 अंशांवर; शिर्डीतील भाविकांच्या गर्दीवर परिणाम
अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. याचा थेट परिणाम जनजीवनावर होत असून दुपारी रस्ते ओस पडत आहेत. तसेच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही घट झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असूनही अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. या परिस्थितीत साईबाबा संस्थानने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. तसेच भाविकांच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून ठिकठिकाणी मॅट्सची सोय केली आहे. त्यासोबतच उन्हापासून संरक्षणासाठी विविध ठिकाणी मांडवही उभारण्यात आले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा; रिक्षा चालकांचे हाल, पंपावर लांबच लांब रांगा
छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा ऑटो एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. शहरातील अनेक गॅस पंप बंद असल्याने रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. शहरातील सावंगी परिसरातील नायरा पंपावर आज सकाळी पाच वाजल्यापासूनच रिक्षा चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गॅस भरण्यासाठी लागलेल्या रिक्षांच्या रांगा चक्क दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत.
-
मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर; पक्ष संघटना बळकटीकरणावर भर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमित ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. संपर्कप्रमुखपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. त्याकडे राजकीय वर्तुळातून विशेष लक्ष दिले जात आहे. आगामी काळातील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक शक्ती वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अमित ठाकरे पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांशी सविस्तर संवाद साधणार आहेत.
-
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण: संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
नाशिकमधील बहुचर्चित TCS कर्मचारी शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणात, मुख्य संशयित आणि फरार असलेली HR मॅनेजर निदा खान हिने अटक टाळण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलले आहे. निदा खान गरोदर असल्याचा दावा करत तिने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असून, नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तिच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, कारवरील नियंत्रण सुटले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आज एक अत्यंत विचित्र आणि थरारक अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी एक चारचाकी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन धडकली. या भीषण धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने गाडीतील तिघेही प्रवासी सुखरूप असून त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती.
-
ठाण्यात वीस हजार अवैध्य पेट्रोलियम साठा शिधावाटप विभागाच्या वतीने जप्त
16 एप्रिल रोजी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. टँकर मधून कोणत्याही वैद्य कागदपत्राशिवाय सुमारे 20 हजार लिटर डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची बेकायदा वाहतूक सुरू असल्याचे उघड. कोपरी पोलीस ठाण्यात च्या हद्दीत तपासणी दरम्यान आलेसमोर. शिधावाटप अधिकारी आणि कोपरी पोलीस यांच्या संयुक्त कारवाई टँकर आणि एका वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे….
-
पंढरपूर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस
भोसे येथील रिलस्टार महिला सोनाली नेताजी जाधव (वय 34) हिचा अनैतिक प्रेमसंबंधातून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली ही सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होती आणि परिसरात रिलस्टार म्हणून ओळखली जात होती. काही कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहून आपल्या माहेरी भोसे येथे राहत होती……..
-
नेकनूरमध्ये बसवलेले महापुरुषांचे पुतळे हटवू नयेत यासाठी शिवप्रेमी आणि भिमसैनिकांचे एकत्रित उपोषण
बीडच्या नेकनूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा रात्रीतुन उभारण्यात आला होता. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील रात्रीतुन उभारण्यात आला होता. या दोन्ही पुतळ्यांमध्ये 100 ते 150 फुटांचे अंतर आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्रित येत या दोन्ही पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र येणाऱ्या काळात आणखी काही महापुरुषांचे पुतळे उभारले जाऊ शकतात तसेच दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे हे पुतळे हटवावेत असे ग्रामपंचायतने तहसीलदारांना पत्र दिलेले आहे. यानंतर पुतळे हटवू नयेत या मागणीसाठी शिवप्रेमी आणि भिमसैनिकांनी एकत्रित येत आंदोलनाला सुरुवात केली आहे.
-
महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट उसळलीये
महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट उसळलीये… आज 17 एप्रिल सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरणार आहे. 23 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी झाला असून 40-44 अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे… नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
-
नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणात मोठी अपडेट
आयटीमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरण. संशयित आरोपींचे सोशल मिडीयावरील गृप्स पोलीस यंत्रणांच्या रडारवर. गृप्स मधील ईतर सदस्य कोण होते ? गृप तयार करण्यामागील नक्की उद्देश काय होता ? याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती. धर्मांतरणसाठी दबाव टाकत संबंधित गृप्समध्ये पिडीतांचा समावेश केला जात होता असाही संशय
-
धनंजय सावंत यांचे भावी आमदार म्हणून बॅनर
आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात पुतण्या धनंजय सावंत यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. धनंजय सावंत यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्याकडून भावी आमदार अशी बॅनरबाजी करण्यात आली. तानाजी सावंत यांना सोडचिठ्ठी देत धनंजय सावंत अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. धनंजय सावंत कुटुंबाचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत काका तानाजी सावंत यांच्या विरुद्ध धनंजय सावंत आव्हान उभा करणार अशी राजकीय चर्चा होत आहे.
-
बीड जिल्ह्यातील स्त्री जन्मदर पुन्हा घसरला, 1000 मुलांमागे 862 मुली
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा जन्मदर घसरला आहे. 1000 मुलांमागे गेल्या वर्षी 937 मुलींचा जन्मदर होता मात्र यावर्षी मुलींचा जन्मदर पुन्हा घसरला असून एक हजार मुलांमागे 862 मुलींचा जन्म होत आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून आम्ही सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणार आहोत विनापरवाना कोणी सोनोग्राफी सेंटर चालवत असेल किंवा दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू तसेच पर जिल्ह्यात जाऊन जर कोणी सोनोग्राफी करत असेल तर आम्ही ट्रॅकिंग करू आणि जर कोणी दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करू असे सांगण्यात आले आहे.
-
दक्षिण राज्यातील खासदारांची संख्या घटणार?
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पूनर्रचना विधेयकामुळे दक्षिण राज्यांना मोठा फटका बसण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. विरोधकांनी यावरून हंगामा केला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. दक्षिण राज्यांची शक्ती कमी होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमधील खासदार वाढतील असा दावा त्यांनी केला. तर उत्तर भारतातील खासदारांची संख्या अधिक असेल आणि भाजप पुढे अनेक वर्ष सत्तेत असेल असा आरोप विरोधकांनी केला.
-
महिला आरक्षण कायदा २०२३ मध्यरात्रीच लागू
संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमावरून जुगलबंदी रंगलेली असतानाच मध्यरात्री महिला आरक्षण कायदा २०२३ लागू करण्याची अधिसूचना काढण्यात आली. कायदा मंत्रालयाने ही अधिसूचना काढली. त्यातंर्गत १०६ वी घटनादुरुस्ती प्रभावी झाल्याचे म्हटले आहे.
-
संसदेच्या विशेष सत्राचा आज दुसरा दिवस
संसदेचे विशेष सत्र सुरू आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. काल महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या प्रस्तावावरून विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मतदानाचे आवाहन करत इशाराही दिला. त्यांच्या भाषणापूर्वी विरोधकांनी सरकारच्या हेतूवर मोठा संशय व्यक्त केला. नवीन जनगणनेनंतर हे विधेयक सभागृहात आणण्याचा आग्रह धरला.
-
राजकारणात महिलांचा टक्का वाढणार?
आज 4 वाजता देशात ऐतिहासिक कायद्यासाठी मतदान होईल. नारी शक्ती वंदन विधेयक आज कनिष्ठ सभागृहासमोर असेल. त्यावर मतदान होईल. यासोबतच विधीमंडळ आणि संसदेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवणारे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरही मतदान होईल. आज देशाचे लक्ष हे संसदेकडे आहे.