दिल्लीतील शेतकरी आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू

दिल्लीतल्या आंदोलनात कडाक्याच्या थंडीत महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे

Nupur Chilkulwar

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 28, 2021 | 7:47 PM

नवी दिल्ली : दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे (Maharashtra Woman Died During Delhi Farmers Protest). सीताबाई रामदास तडवी असं या महिलेचं नाव आहे. 16 जानेवारीपासून दिल्लीतल्या शहाजनपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात त्या सहभागी होत्या (Maharashtra Woman Died During Delhi Farmers Protest).

दिल्लीत पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे 56 वर्षांच्या सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातल्या अंबाबरी गावच्या आहेत. सीताबाई तडवी यांचं पार्थिव दिल्लीहून नंदुरबारला त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

शेतकरी प्रश्नावर महाराष्ट्राच्या आदिवासी लढाऊ महिलेचं बलिदान

56 वर्षीय सिताबाई रामदास तडवी नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबारी जिल्ह्यातील रहिवासी होत्या. त्या महाराष्ट्रातील लोक संघर्ष मोर्चाच्या आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. मागील 25 वर्षांपासून त्या लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देत होत्या. शेतकऱ्यांचे हक्क असो की त्यांच्या स्वतःच्या आंबबारी गावातील देहली नदीवरील धरणामुळे निर्माण झालेला पुनर्वसनाचा प्रश्न असो या सर्वात सिताबाई कायमच आघाडीवर होत्या. सिताबाईंनी आपल्या गावात धरणाच्या कामात होणाऱ्या अन्याय्य आणि जबरदस्तीच्या जमीन अधिग्रहणाला जोरकस विरोध केला. यासाठी सीताबाई जेलमध्येही गेल्या.

जंगल, जमिनीच्या लढ्यात सीताबाई नंदुरबारहून मुंबईला 480 किलोमीटर पायी यात्रेत 5000 महिलांचं नेतृत्व केलं. मुंबईत त्यांनी या प्रश्नासाठी उपोषणही केले. वन अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्या आपल्या आदिवासी गावातून अगदी दिल्लीपर्यंत संघर्ष करत राहिल्या. 2018 मध्ये संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमी भावाच्या लढ्यात सीताबा़ई लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून लढा उभारला. त्यांचं संपूर्ण कुटुंब या लोक लढ्यात सक्रीय आहे.

22 डिसेंबरला अंबानींविरोधात मुंबईमध्ये झालेल्या मोर्चातही सीताबा़ई प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. 5 जूनपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील प्रत्येक शेतकरी आंदोलनात सीताबाईंचा सक्रीय सहभाग होता. त्या 16 जानेवारी ते 27 जानेवारीदरम्यान दिल्लीतील शहाजापुर बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करत होत्या. मात्र, दिल्लीतील कडाक्याच्या थंडीने त्यांचा जीव घेतला. लढाऊ आदिवासी सीताबा़ई तडवींच्या मृत्यूने आंदोलनाचं मोठं नुकसान झाल्याची भावना लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केलीय. तसेच सीताबा़ईंचं शेतकरी आंदोलनातील योगदान कायमच लक्षात राहिलं, असंही त्यांनी नमूद केलं. उद्या (29 जानेवारी) सीताबाईंच्या मृतदेहावर त्यांचं गाव आंबाबारी (नंदुरबार) येथे सकाळी 10 वाजता अत्यंसंस्कार होणार आहेत.

दिल्लीत रक्त गोठवणारी थंडी

दिल्लीत सध्या रक्त गोठवणारी थंडी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली गारठली आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच, हवामान विभागाने येत्या दो-तीन दिवसांपर्यंत अशीच थंडी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मोदी सरकारने मंजूर केलेले नवे तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. इतक्या थंडीतही शेतकरी अद्याप आंदोलनावर कायम आहेत. याच दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या सीताबाई रामदास तडवी यांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे.

Maharashtra Woman Died During Delhi Farmers Protest

संबंधित बातम्या :

हिंसक ट्रॅक्टर मार्चने शेतकरी आंदोलनाच्या अडचणीत वाढ, संसद घेराव रद्द होणार?

दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल

Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलिस

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें