दोस्ती, दारू अन् हत्या, 60 लाखांच्या विम्यासाठी तरूणाला संपवलं, हादरवणाऱ्या घटनेनं देशात खळबळ
Murder Crime : राजस्थानच्या अलवरमध्ये विम्याचे 60 लाख रुपये मिळवण्यासाठी एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. तीन तरुणांनी हे भयानक कृत्य केले आहे. आता तिघांनाही जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

पैशांसाठी लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. राजस्थानमधील अलवरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याचे 60 लाख रुपये मिळवण्यासाठी एका तरूणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तीन मित्रांनी पैशांच्या लोभापोटी हे कृत्य केले आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर आता न्यायालयानी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विम्याच्या पैशांसाठी तरूणाची हत्या
अलवरमधील या घटनेबाबत सरकारी वकील नवनीत तिवारी यांनी माहिती देताना म्हटले की, अनिलचा भाऊ सुनील बराच काळ बेपत्ता होता. त्यामुळे अनिलने सुनीलला मृत म्हणून दाखवून त्याच्या नावावर असलेल्या एलआयसी पॉलिसीचे 60 लाख रुपये मिळवण्याची योजना आखली. यासाठी सुनीलचे मृत्यूपत्र हवे होते. यासाठी अनिलने पवन आणि याकूबसह सुनीलसारखा दिसणाऱ्या एका तरुणाचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोध सुरु असताना त्यांना सालपूर येथे ढाब्यावर काम करणारा रामकेश दिसला.
दोस्ती, दारू आणि हत्या
रामकेशचा खून करून तो सुनील आहे असं दाखवून विम्याचे 60 लाख रुपये मिळवण्याची आरोपींची योजना होती. या आरोपींनी सुरुवातीला रामकेशशी मैत्री केली. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी त्यांनी त्याला नवीन कपडे दिले. दारू पाजण्याच्या बहाण्याने त्याला दूर नेले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर सुनीलचे मतदार ओळखपत्र रामकेशच्या खिशात ठेवले, जेणेकरून हा मृतदेह सुनीलचा आहे असं वाटावा आणि विम्याचे पैसे आपल्याला मिळावेत.
पोलीस तपासानंतर कांड आले समोर
या हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांना वाटले की हा मृतदेह सुनीलचा आहे. मात्र पोलींसांना तपासादरम्यान संशय वाढला. तपासासाठी त्यांनी अनिल आणि पवनला अटक केली, त्यांची चौकशी सुरू असताना अनिलने गुन्हा केल्याचे मान्य केले. या हत्येप्रकरणी पवन आणि याकूबला यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता अनिललाही जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेमुळे अलवर परिसर हादरला आहे. पैशांसाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे यातून स्पष्ट झाले आहे.
