असा निर्णय घ्यायला जिगरा लागतो… एका झटक्यात बीडी, सिगरेट, गुटखा, तंबाखूवर बंदी; दुकानात स्टॉक ठेवला तर…
या राज्य सरकारचा मोठा निर्णय. बीडी, सिगरेट, गुटखा, तंबाखूवर बंदी. जर दुकानात स्टॉक ठेवला तर होणार कारवाई. कोणत्या राज्यात बंदी?

Tobacco Banne : देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात लोक व्यसन करताना दिसत आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण व्यसन करत आहेत. अशातच आता ओडिशामध्ये पान दुकानावर पाऊल टाकताच दिसणारे दृश्य पूर्णपणे बदलणार आहे. बीडी, सिगारेट, गुटखा, पान मसाला, जर्दा, खैनी आणि तंबाखूजन्य सर्व उत्पादने आता दुकानांतून गायब होणार आहेत. ओडिशा सरकारने या सर्व उत्पादनांच्या उत्पादन, साठवणूक, पॅकेजिंग आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे. सरकारच्या या कठोर निर्णयामुळे दुकानदारांपासून ते सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे.
हा निर्णय केवळ नवीन विक्रीपुरताच मर्यादित नाही तर दुकानांमध्ये आधीपासून पडून असलेल्या जुन्या स्टॉक संदर्भात देखील आहे. यामुले मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, आता हा साठा विकता येणार का, की तोही बेकायदेशीर ठरणार आहे? याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे.
ओडिशामध्ये तंबाखूवर पूर्ण बंदी का?
ओडिशा सरकारने 21 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करत गुटखा, पान मसाला, तंबाखू, निकोटीनयुक्त आणि स्मोकलेस तंबाखूच्या सर्व उत्पादनांवर पूर्ण बंदी लागू केली आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार आणि FSSAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थ हे अन्नपदार्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक होते.
याशिवाय, वेगवेगळ्या पॅकेटमध्ये विकले जाणारे आणि नंतर एकत्र करून सेवन केले जाणारे पदार्थही बेकायदेशीर ठरणार आहेत. तंबाखू किंवा निकोटीन मिसळलेला कोणताही खाद्यपदार्थ आता गैरकानूनी मानला जाणार आहे.
दुकानदार जुना साठा विकू शकतात का?
या निर्णयानंतर दुकानदारांमध्ये सर्वात मोठी चिंता म्हणजे जुना साठा विकता येणार का? यावर सरकारने कोणतीही सवलत दिलेली नाही. बंदी लागू झाल्यानंतर जुना किंवा नवा कोणताही साठा विकता येणार नाही. केवळ विक्रीच नाही तर तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवणेही गुन्हा मानले जाणार आहे. म्हणजेच, दुकानात आधीपासून ठेवलेला गुटखा किंवा तंबाखूही आता कायद्याच्या कचाट्यात येणार आहे.
आकडेवारीनुसार, ओडिशामध्ये 42 टक्क्यांहून अधिक प्रौढ स्मोकलेस तंबाखूचे सेवन करतात, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. विशेष म्हणजे, लहान मुले आणि तरुण मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. कमी वयात सुरू झालेली ही सवय भविष्यात गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे.
