पहलगामनंतर पाकिस्तानची तडफड सुरुच, भारताच्या ‘त्या’ निर्णयाची केली कॉपी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक बिघडले आहेत. भारताने पाकिस्तानी जहाजांना आपल्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे, तसेच पाकिस्ताननेही भारतीय जहाजांना आपल्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या किंवा पाकिस्तानमधून मालाची वाहतूक करणाऱ्या पाकिस्तानी जहाजांना भारतातील बंदरांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यानंतर पाकिस्तानकडूनही आता भारतीय जहाजांना पाकिस्तानच्या बंदरांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री उशिरा पाकिस्तानने काही आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, कोणत्याही भारतीय जहाजाला पाकिस्तानी बंदरांवर येण्याची परवानगी नसेल. यासोबतच, पाकिस्तानी कोणत्याही जहाजांना भारतीय बंदरावर थांबण्यास मनाई असेल.
भारतीय जहाजे पाकिस्तानी बंदरांवर जाऊ शकणार नाहीत
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सागरी सीमा आणि आर्थिक हित तसेच राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता, पाकिस्तानने तातडीने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार, आता भारतीय जहाजे पाकिस्तानी बंदरांवर जाऊ शकणार नाहीत आणि पाकिस्तानी जहाजे भारतीय बंदरांवर येऊ शकणार नाहीत.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. याआधीच भारताने पाकिस्तानसोबत हवाई, भूमार्गाद्वारे होणारे दळणवळण तसेच देवाणघेवाण थांबवली आहे.
पाकिस्तानी वस्तूंची आयातही बंद
भारताच्या नौवहन महासंचालनालयाने (डीजीएस) दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बंदरांमध्ये पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. भारताने आपल्या जहाजांनाही पाकिस्तानी बंदरांवर जाण्यास मनाई केली आहे. हे निर्बंध तातडीने लागू करण्यात आले आहेत. भारत सरकारच्या आदेशानुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण लक्षात घेता, पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर 2019 मध्येच भारताने पाकिस्तानी वस्तूंवर 200 टक्के आयात शुल्क लावल्यामुळे थेट आयात थांबली होती. मात्र, आताच्या नवीन निर्णयामुळे तिसऱ्या देशांमार्फत होणारी पाकिस्तानी वस्तूंची आयातही पूर्णपणे थांबणार आहे. याचा पाकिस्तानला खूप मोठा धक्का बसला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत, सिंधू जल समझौता स्थगित करणे, अटारी येथील एकमेव भू सीमा व्यापार केंद्र बंद करणे आणि राजनैतिक संबंध कमी करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. यानंतर आता जहाजांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
