भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेच्या व्यापार कराराबाबत मोठी अपडेट, पियुष गोयल म्हणाले…
India USA Trade Deal: अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. या व्यापार कराराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे विधान केले आहे.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. हा करार झाल्यास भारतावरील कर कमी होण्याची शक्यता आहे. अशातच आता या व्यापार कराराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या टॅरिफबाबत भारताला कधी चांगली बातमी मिळेल? या प्रश्नावर बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे विधान केले आहे.
करार राष्ट्रीय हित लक्षात घेऊन केला जाणार – गोयल
भारत आणि अमेरिका व्यापार कराराबाबतच्या प्रश्नावर बोलताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, ‘दोन्ही देशांमधील व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. व्यापार करार किंवा व्यापार वाटाघाटीसाठी एखादी अंतिम मुदत नसते. अमेरिकेसोबत कोणताही करार राष्ट्रीय हित लक्षात घेऊन केला जाणार आहे. कोणत्याही मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. व्यापार करार पूर्ण झाल्यानंतर माध्यमांना सविस्तर माहिती दिली जाईल.
आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण
भारत अमेरिका व्यापार करारात अमेरिका भारताच्या कृषी क्षेत्रात सवलती मागत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो, त्यामुळे अद्याप याबाबत सहमती झालेली नाही. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या कराराबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला गेले होते. त्यापूर्वी अनेक अमेरिकन अधिकारीही भारताच्या दौऱ्यावर आले होते. आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक फेरीतील चर्चा ही सकारात्मक होती अशी माहिती दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.
भारताच्या निर्यातीत वाढ होणार
अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतीय निर्यात अडचणीत सापडली असल्याचे चित्र आहे. मात्र आगामी काळात भारताच्या निर्यातीत सकारात्मक वाढ होईल असं गोयल यांनी म्हटलं आहे. गोयल म्हणाले की, ‘या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत वाढ झाली आहे. एप्रिल-सप्टेंबरमध्ये निर्यात सुमारे पाच टक्क्यांनी वाढून 413.3 अब्ज डॉलर्स झाली आहे. आगामी काळात ही निर्यात आणखी वाढण्याची शक्यता गोयल यांनी वर्तवली आहे.
