‘लालफितीच्या कारभारामुळे निर्णय रखडणार नाहीत, एकाच ठिकाणी परवानगी मिळणार; भारतीय सैन्य स्वबळावर सक्षम होणार’

PM Modi | आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारताला स्वतःच्या बळावर जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे, भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास हे देशाचे ध्येय आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्या संरक्षण क्षेत्रात एवढे मोठे बदल होत आहेत. जुनाट धोरणांऐवजी सिंगल विंडो सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.

'लालफितीच्या कारभारामुळे निर्णय रखडणार नाहीत, एकाच ठिकाणी परवानगी मिळणार; भारतीय सैन्य स्वबळावर सक्षम होणार'
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सात नवीन संरक्षण कंपन्या राष्ट्राला समर्पित केल्या. या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की आज माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आहे. कलाम साहेबांनी ज्याप्रकारे शक्तिशाली भारताच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले, ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सात नवीन कंपन्या ज्या आज संरक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहेत, त्यामुळे सक्षम राष्ट्राचा त्यांचा संकल्प आणखी मजबूत होईल.

भारताल सक्षम आणि अजेय करण्यासाठी जे लोक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत, त्यांच्या सामर्थ्यात भर टाकण्यासाठी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपण एका नव्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

दशकांपासून रखडलेली कामे मार्गी लागली

भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात नवीन भविष्य घडवण्यासाठी नवीन संकल्प केले जात आहेत. अनेक दशकांपासून अडकलेली कामे पूर्ण केली जात आहेत. 41 आयुध निर्माण कारखान्यांचे 7 नवीन कंपन्यामध्ये रुपांत केले जात आहे. हा निर्णय गेली 15-20 वर्षे रखडला होता. मला विश्वास आहे की या सर्व सात कंपन्या येत्या काळात भारताच्या लष्करी सामर्थ्याचा प्रमुख आधार बनतील.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी जगाने भारताच्या आयुध कारखान्यांची ताकद पाहिली आहे. आमच्याकडे उत्तम संसाधने, जागतिक दर्जाची कौशल्ये असायची. स्वातंत्र्यानंतर आपल्याला हे कारखाने अपग्रेड करण्याची, नवीन युगाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज होती, पण त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. काही काळापूर्वी, संरक्षण मंत्रालयाने अशा 100 हून अधिक रणनीतिक उपकरणांची यादी जाहीर केली होती, जी आता बाहेरून आयात केली जाणार नाहीत. देशाने या नवीन कंपन्यांसाठी 65,000 कोटी रुपयांची ऑर्डर आधीच दिली आहे. यावरून आपल्या संरक्षण उद्योगावर देशाचा विश्वास दिसून येतो, असे मोदींनी म्हटले.

‘निर्णय रखडणार नाहीत’

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्या संरक्षण क्षेत्रात एवढे मोठे बदल होत आहेत. जुनाट धोरणांऐवजी सिंगल विंडो सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारताला स्वतःच्या बळावर जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे, भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास हे देशाचे ध्येय आहे. गेल्या सात वर्षांत देशाने ‘मेक इन इंडिया’च्या मंत्राने हा संकल्प पुढे नेण्याचे काम केले आहे. आज, देशाच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाबद्दल पारदर्शकता, विश्वास आणि वृत्तीचे प्रमाण यापूर्वी कधीच दिसली नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोणत्या सात कंपन्यांचे लोकार्पण?

या सात संरक्षण कंपन्यांमध्ये मुनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (अवनी); एडवांस्ड वेपन्स एंड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (एडब्ल्यूई इंडिया); ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड (टीसीएल); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आईओएल) आणि ग्लाइडर्स इंडिया लिमिटेडचा (जीआईएल) समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI