‘पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन’, मुख्यमंत्री चन्नी यांचं वक्तव्य, राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरुन भाजपवर घणाघात

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जीविताला कोणताही धोका नव्हता, असा पुनरुच्चार केलाय. केंद्र सरकार हे प्रकरण अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप चन्नी यांनी केलाय. राज्यात गोळी चालेल तर पहिली गोळी मी खाईन, असं वक्तव्यही चन्नी यांनी केलं आहे.

'पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन', मुख्यमंत्री चन्नी यांचं वक्तव्य, राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरुन भाजपवर घणाघात
चरणजीतसिंह चन्नी, मुख्यमंत्री, पंजाब

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात (National Politics) मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांकडून पंजाब सरकार (Punjab Government) आणि काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येतेय. अशावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जीविताला कोणताही धोका नव्हता, असा पुनरुच्चार केलाय. केंद्र सरकार हे प्रकरण अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप चन्नी यांनी केलाय. राज्यात गोळी चालेल तर पहिली गोळी मी खाईन, असं वक्तव्यही चन्नी यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर जोरदार टीका केलीय. पंतप्रधान मोदी हे हेलिकॉप्टरने येणार होते. मात्र, त्यांनी अचानक निर्णय बदलला. आमच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत कुठलीही चूक झालेली नाही, अशावेळी अधिकाऱ्यांना नोटीस का दिली जातेय? मुख्य सचिव आणि डीजीपींना केंद्र सरकारकडून नोटीस देण्यात आली आहे. केंद्र सरकार निवडणुकीपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू करुन पंजाबमध्ये राज्य करु इच्छित आहे, असा आरोप चन्नी यांनी केलाय.

पंजाबी आणि पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकमेकांविरोधात प्रश्न उपस्थित करत राहिलो तर अनेक प्रश्न उपस्थित केले जातील, असंही चन्नी म्हणाले. आम्ही निर्माण केलेल्या चौकशी समितीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. केंद्राकडून जे सुरक्षा इंन्चार्ज होते यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तपास रोखून चांगलं केलं, असंही चन्नी म्हणाले.

नवज्योतसिंह सिद्धू यांचाही भाजपवर निशाणा

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्ते मार्गानं जाण्याचं नियोजन अचानक का करण्यात आलं? फिरोजपूरमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळेच हे संपूर्ण नाटक रचण्यात आलं. 70 हजार खुर्च्या आणि फक्त 500 लोक होते. पंजाबमध्ये भाजपला समर्थक नाहीत. पंजाबमध्ये भाजप पूर्णपणे उघडी पडली असल्याची घणाघाती टीका सिद्धू यांनी केलीय.

‘भाजपनं आता राजकारण करणं बंद केलं पाहिजे. येथे तुम्हाला उत्तर मिळेल. पंजाबमध्ये राष्ट्रपती शासनाचा मुद्दा उपस्थित करणारे तुमचे (भाजपचे) पोपट आहेत’, अशी टीका सिद्धू यांनी केलीय. पंतप्रधान महोदय तु्म्ही केवळ भाजपचे नाही तर सर्वांचे पंतप्रधान आहात. तुमच्या जीविताची किंमत देशातील प्रत्येक लहान मुलही जाणतं. पंजाबमध्ये जीविताला धोका असल्याचं तुम्ही म्हणालात. हा या राज्याचा पंजाबियतचा अपमान आहे, असंही सिद्धू म्हणाले.

इतर बातम्या : 

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू

विद्या चव्हाण यांच्या ‘डान्सिंग डॉल’ला अमृता फडणवीसांचं अब्रुनुकसानीच्या दाव्यानं उत्तर, नेमकं प्रकरण काय?

Published On - 12:32 am, Sat, 8 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI