Rafale induction | राफेलचा राज्याभिषेक; राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राफेल विमानांचे पूजन

Rafale induction | राफेलचा राज्याभिषेक; राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत राफेल विमानांचे पूजन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या साक्षीने अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला.

अनिश बेंद्रे

|

Sep 10, 2020 | 10:51 AM

गुरुग्राम : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा दोन महिन्यांपूर्वी भारताच्या अंबाला एअरबेसवर दाखल झाला. वायू दलात समावेश करण्यापूर्वी राफेल विमानांचे सर्वधर्मीयांकडून पूजन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत आणि वायुसेनेचे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत राफेल विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली. (Rafale induction ceremony at Ambala airbase)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या साक्षीने अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला. पारंपरिक पद्धतीने ‘सर्वधर्म पूजन’ करण्यात आले. मुस्लीम, शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी प्रार्थना केली.

भारतीय वायुदलाला या लढाऊ विमानांमुळे प्रचंड मोठी शक्ती मिळणार आहे. पाच राफेल विमानांनी 27 जुलैला फ्रान्समधून उड्डाण केले होते. फ्रान्स ते भारत या जवळपास 7 हजार किमी प्रवासात त्यांना संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अल डाफरा एअरबेसवर थांबा देण्यात आला होता. त्यानंतर 29 जुलैला त्यांचे भारताच्या अंबाला एअरबेसवर आगमन झाले.

राफेल विमान

मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. (Rafale induction ceremony at Ambala airbase)

राफेलचं वैशिष्ट्य काय?

  • राफेल लढाऊ विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकते
  • राफेलची मारक क्षमता जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे
  • हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकते
  • राफेलमध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे?

भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला.

ही विमानं फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती. (Rafale induction ceremony at Ambala airbase)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें