S-400 : पाकचे हल्ले परतवून लावणाऱ्या S-400 चे मिसाइल डागण्यासाठी खर्च किती ?आकडा ऐकून म्हणाल…
2018 साली, भारताने रशियासोबत S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या 5 स्क्वॉड्रनसाठी सुमारे 35 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली होती. पाकिस्तानकडून करण्यात आलेले हल्ले परतवण्यात S-400 ने महत्वाची भूमिका बजावली.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्यावर पाकड्यांचा जळफळाट झाला आणि त्यांनी भारतावर पुन्हा परतून हल्ला केला. पाकने केलेला प्रत्येक ड्रोन हल्ला, मिसाईल अटॅक भारताने यशस्वीपणे परतवून लावला. यामध्ये S-400 मिसाइल सिस्टिम भारताची अभेद्या सुरक्षा कवच बनली. पाकचा प्रत्येक हल्ला हा S-400 सुदर्शन चक्रने अयशस्वी ठरवला. लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, 8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारतावर सुमारे 300 ते 400 क्षेपणास्त्रे डागली, परंतु बहुतेक क्षेपणास्त्रे ही आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने रोखली आणि हवेतच नष्ट केली. सुमारे तीन दिवसांच्या या संघर्षानंतर, रशियन बनावटीच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमबद्दल चर्चा खूप वाढली आहे. त्याबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची लोकांची उत्सुकताही वाढली आहे.
2018 साली भारताने रशियासोबत S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या 5 स्क्वॉड्रनसाठी सुमारे 35 हजार कोटींचा करार केला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि चीनकडून संभाव्य धोका लक्षात घेता भारताने ही एअर डिफेन्स सिस्टीम दोन्ही सीमेवर तैनात केली. S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि त्यावरून क्षेपणास्त्र डागण्यासाठी किती खर्च येतो याबद्दल जाणून घेऊया.
S-400 मधून एका वेळेत 72 मिसाईल्सचा करता येतो मारा
S-400 ही रशियाने बनवलेली एअर डिफेन्स सिस्टीम आहे, जी जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते. ही अशी एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येते.एवढेच नाही तर त्याचे रडार 600 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमधील सुमारे 300 टार्गेट्सचा मागोवा घेऊ शकतो आणि 400 किलोमीटरच्या रेंजमधील शत्रूची मिसाइल्स पाडू शकतो. ही प्रणाली एका वेळी 72 मिसाइल्स डागू शकते आणि मायनस 50 ते 70 अंश तापमानातही कार्य करण्यास ही अर डिफेन्स सिस्टीम सक्षम आहे. S-400 मध्ये चार प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत, ज्यांची रेंज क्षमता 40, 100,200 आणि 400 किलोमीटर आहे.
या चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला जातो
48N6E3: हे एक हाय स्पीड मिसाइल असून त्याची रेंज 250 किलोमीटर पर्यंत आहे.
40N6E: हे एक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, ज्याची मारा क्षमता 400 किलोमीटरपर्यंत आहे.
9M96E आणि 9M96E2: ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.
एका मिसाईलची किंमत किती ?
मीडिया रिपोर्टनुसार, S-400 मिसाइल सिस्टीम मधील सर्वात महागडे मिसाइल हे 40N6E आहे, जे 400 किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूच्या क्षेपणास्त्रांना टार्गेट करून पाडू शकतं. या श्रेणीच्या क्षेपणास्त्रांची किंमत सुमारे 1-2 मिलियन डॉलरपर्यंत असू शकते. याशिवाय, त्यात विविध प्रकारचे मिसाइल्स वापरले जातात, ज्यांची किंमत 3 लाख डॉलर्स ते 10 लाख डॉलर्सपर्यंत असू शकते.
