भारतात वाढत आहेत कोविड केसेस, स्वतःचे रक्षण करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
कोविडचे रुग्ण पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेश, नोएडापर्यंत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः जर तुम्हाला दररोज बाहेर जावे लागत असेल तर तुम्ही या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सर्वांना हादरवून टाकले होते. 2020 मध्ये पहिल्यांदाच त्याची प्रकरणे समोर येऊ लागली आणि त्यानंतर अनेक नवीन व्हेरिएंट समोर आले. त्यानंतर सर्वांना कोविड लसीकरण देखील दिले गेलेत, परंतु 5 वर्षांनंतरही कोविडची प्रकरणे वारंवार समोर येत आलीत. अशातच आता पुन्हा एकदा भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या केसेस समोर आल्या आहेत. यावेळी समोर आलेल्या प्रकरणांमध्ये, कोविड प्रकाराला ‘जेएन 1’ असे नाव देण्यात आले आहे. हा कोविडचा प्रकार जुना असला तरीही आपण सर्वांनी सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना दररोज खूप गर्दी असलेल्या ठिकाणी कामाला जावे लागते अशा लोकांनी काळजी घ्यावी.
कोविडच्या धोक्याच्या गांभीर्याबद्दल अद्याप कोणताही इशारा देण्यात आलेला नसला तरी, अलीकडील प्रकरणे पाहता, खबरदारी घेणे महत्वाचे आहे, कारण खोकणे, शिंकणे आणि अगदी हातांनीही हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. तर अशावेळेस आपण सर्वांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
बाहेर पडताना ही काळजी घ्या
तुम्ही जर बाहेर जात असाल तर मास्क नक्कीच वापरा, पण लक्षात ठेवा की तुम्ही दररोज स्वच्छ केलेला मास्कचा वापर करावा आणि त्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करू नका. लक्षात ठेवा की तुमच्या तोंडासोबतच तुमचे नाक देखील मास्कने व्यवस्थित झाकलेले असले पाहिजे.




गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्या
तुम्ही बस, ऑटो, मेट्रो किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून प्रवास करत असाल तर अंतर राखण्याचा प्रयत्न करा आणि विशेषतः मास्क घाला. तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी तुमचे हात स्वच्छ धुत राहण्यासाठी तुमच्यासोबत एक छोटा सॅनिटायझर ठेवा.
सर्दी आणि खोकला झाल्यास घ्यावयाची काळजी
एखाद्याला सर्दी आणि खोकला असेल तर त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि जर तुम्हालाही या समस्या असतील तर खोकताना किंवा शिंकताना तुमचे नाक आणि तोंड टिशूने किंवा रूमालाने झाकून घ्या. वापरल्यानंतर ते फेकून द्या. तुमचे हात ताबडतोब स्वच्छ करा.
घरी परतताना घ्यावयाची काळजी
बाहेरून घरी परतल्यानंतर, खुर्ची, पलंग इत्यादी गोष्टींवर जाऊन थेट बसू नका. प्रथम मास्क काढा. जर तो मेडिकल मास्क असेल तर तो ताबडतोब कचऱ्याच्या डब्यात टाका. यानंतर, तुमचे हात, पाय आणि चेहरा स्वच्छ करा, कपडे देखील बदला आणि हात स्वच्छ करा. अशा प्रकारे काही लहान खबरदारी घेतली पाहिजे.
आहार योग्य ठेवा
कोविडपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात निरोगी व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट दुधात चिमूटभर हळद पावडर मिक्स करून त्यांचे सेवन करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)