बिहार जिंकलं? उत्तर प्रदेशही जिंकणार? विनोद तावडेंसमोर यूपीत काय असणार आव्हाने?
बिहार जिंकल्यानंतर विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रभारीपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यूपीतील आव्हानं बिहारपेक्षा वेगळी आणि गुंतागुंतीची आहेत. यादव, दलित आणि अल्पसंख्यांक मतदारांना आकर्षित करण्यासाठी अखिलेश-मायावतींचे प्रयत्न, ओबीसी मतांचे संतुलन आणि भाजपच्या पारंपरिक मतपेढीला टिकवून ठेवणे हे तावडेंसाठी महत्त्वाचे असेल. राम मंदिराच्या दान चोरीसारख्या मुद्द्यांवरही त्यांना लक्ष द्यावे लागेल, हे सर्व आव्हानं ते कसे पेलतात, याकडे लक्ष आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली टीम जारी केली आहे. ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये फोकस देण्यात आला आहे. बिहार जिंकून देणारे विनोद तावडे यांनाही या टीममध्ये महासचिवपदी कायम ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तावडे यांनी बिहार जिंकून दिल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने हा विश्वास टाकला आहे. तावडेंवरची ही आजवरची सर्वात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तावडेंनी बिहार जिंकून दिलं. तिथल्या समस्या वेगळ्या होत्या. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. या राज्यातील समस्या वेगळ्या आहेत. तिथले प्रश्न वेगळे आहेत. इथली आव्हाने वेगळी आहेत. ही सर्व आव्हाने तावडे पेलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नितीन नवीन यांनी विनोद तावडेंना यूपीचे प्रभारी केले आहे. तर जगदीश ईश्वरभाई पटेल यांना सह प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश हा भाजपचा सर्वात मजबूत गढ आहे. तितकंच यूपीचं मैदान मारणं कठिणही आहे. बिहारमध्ये मित्र पक्षांसोबत सीट शेअरिंग आणि तळागाळापर्यंत तालमेळ राखणाऱ्या विनोद तावडेंना मात्र उत्तर प्रदेशात अनेक आव्हानांना समोरे जावं लागणार आहे.
बिहार सोपं, पण यूपी…?
विनोद तावडे हा भाजपमधील अत्यंत भरवशाचा चेहरा आहे. तसेच मुत्सद्दी राजकारणी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. बिहारमध्ये राजकीय बदल आणि पक्षातील अंतर्गत वाद थोपवण्यात त्यांना यश आलं होतं. त्यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड पाहूनच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तावडे मराठा आहेत. जर जगदीशभाई ईश्वरभाई पटेल हे कुर्मी समुदायातून येतात. 2027 मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गैर यादव ओबीसी आणि कोअर वोटबँकेत संतुलन ठेवणं यावर तावडे यांचं प्राधान्य असणार आहे.
मायावती आणि अखिलेश यादवांचं आव्हान
तावडेंना सर्वात पहिल्यांदा राज्यातील संघटन, राज्य सरकार आणि तळागाळातील कॅडर यांच्यात संतुलन साधावं लागणार आहे. 2024च्या सर्वसाधारण निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा फटका यूपीत बसला होता. त्यामुळे यावेळी गाफिल राहून चालणार नाही. समाजवादी पार्टीचा पीडीए ( मागास, दलित आणि अल्पसंख्यांक) फॉर्म्युल्याला तावडेंना तोड शोधावी लागणार आहे. दुसरीकडे मायावती यांता दलित-ब्राह्मणांची मोट बांधत आहेत. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. दोन टर्मपासून योगी आदित्यनाथ हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दलचा थोड्या बहुत प्रमाणात नागरिकांमध्ये रोष असणार आहे. हा रोष थांबवण्यासाठी तावडे यांना प्राधान्य द्यावं लागेल. त्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर काही योजना घोषित करून वोटर फिरवावे लागणार आहेत.
वोट बँक ते दान चोरी
त्यासोबतच गैर यादव आणि ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे. ही वोट बँक कायम ठेवण्याचं कसब साधावं लागणार आहे. कारण अखिलेश यादव आणि मायावती या वोट बँकेला छेद देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तावडेंना या वोटबँकेसाठी ठोस कार्यक्रम द्यावा लागणार आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशात अयोध्या राम मंदिरातील दान चोरीचं प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणावरून विरोधक थेट भाजपच्या हिंदूत्वाची पोलखोल करण्याची शक्यता आहे. अशावेळी विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढायची की हिंदुत्वाचा मुद्दा हाती घ्यायाचा याकडेही तावडेंना लक्ष द्यावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्र पक्ष. उत्तर प्रदेशातील मित्र पक्षांना सन्मानाच्या जागा देऊन सीट शेअरिंगचा एक सन्मानिय तोडगा काढावा लागणार आहे.
