Pahalgam Terror Attack: भारतात दहशतवादी हल्ला होताच पाकिस्तानमधील लोकांनी गुगलवर काय सर्च केलं?
Pahalgam Terror Attack: भारतातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम हा पाकिस्तानमधील सोशल मीडियावर दिसून येत आहे. तेथील लोक नेमकं काय सर्च करत आहेत चला जाणून घेऊया...

काश्मीरमधील पहलगामच्या बैसनर खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळी केला. काही पर्यटकांना धर्म विचारून त्यांना लक्ष्य केलं गेलं. या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांचा रोष उफाळून आला आहे. अनेकजण पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटनांबद्दल संताप व्यक्त करत आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये देखील सोशल मीडियावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाममधील हल्ला चार दहशतवाद्यांनी केला होता. त्यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक आहेत. या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानमधील सोशल मीडियावर देखील होताना दिसत आहे. एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर #PahalgamTerroristAttack हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. तसेच #Modi हा हॅशटॅग देखील मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. हे दोन्ही हॅशटॅग पाकिस्तानमधील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये लोक गुगलवर या हल्ल्याशी संबंधित ‘पहलगाम’ आणि ‘पहलगाम हल्ला’ असे कीवर्ड देखील शोधत आहेत. या हल्ल्याबाबत शेजारील देशात अस्वस्थता आणि अशांतता आहे हे स्पष्ट आहे.
वाचा: दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला, प्रश्न विचारताच केले दुर्लक्ष
या हल्ल्याबाबत पाकिस्तानकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आल्या आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात ते म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. दरम्यान, भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलं की, मला विश्वास आहे पाकिस्तान भारताच्या कोणत्याही हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावं लागेल
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत (एसव्हीईएस) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना यापूर्वी जारी केलेले कोणतेही एसव्हीईएस व्हिसा रद्द समजले जातील. एसव्हीईएस व्हिसाअंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावा लागेल.