5 दहशतवादी, 180 प्रवासी, 3 मोठ्या मागण्या.. देशाला हादरवून टाकणाऱ्या ‘IC 814: कंदाहार हायजॅक’ची A टू Z कहाणी

'IC 814' या विमान अपहरणाच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. तीन मोठ्या मागण्यांसाठी पाच दहशतवाद्यांनी या विमानाचं अपहरण केलं होतं. हे अपहरण कसं झालं, दहशतवाद्यांच्या मागण्या काय होत्या, प्रवाशांची सुटका कशी झाली, याविषयीची सविस्तर माहिती..

5 दहशतवादी, 180 प्रवासी, 3 मोठ्या मागण्या.. देशाला हादरवून टाकणाऱ्या 'IC 814: कंदाहार हायजॅक'ची A टू Z कहाणी
IC 814 Kandahar hijack Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 12:47 PM

1999 मध्ये झालेल्या ‘आयसी 814’ या विमान अपहरणाच्या घटनेचा उल्लेख भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठी घटना म्हणून केला जातो. नेपाळच्या काठमांडूहून भारतातील दिल्लीपर्यंत येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 या विमानाचं उड्डाण केल्यानंतर काही क्षणांत पाच दहशवाद्यांनी अपहरण केलं. अपहरण केलेलं विमान त्यातील 180 प्रवाशांसह सात दिवस अफगाणिस्तानातील कंदाहार इथं ठेवण्यात आलं होतं. यात एका तरुणाला आपला जीवदेखील गमवावा लागला होता. याच घटनेवर आधारित ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंदाहार हायजॅक नक्की का करण्यात आलं होतं, अपहरणकर्त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे हायजॅक कसं करण्यात आलं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

24 डिसेंबर 1999 रोजी दुपारी पाच जणांनी सरकारी मालकीच्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण केलं होतं. दहशतवाद्यांशी चर्चा, तीन दहशतवाद्यांची सुटका, तालिबानचा सहभाग आणि विमानातील एका प्रवाशाचा मृत्यू या सर्व घटना जवळपास एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत चालल्या होत्या. या घटनेनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कामगिरीबद्दलही प्रश्न उपस्थित केले होते.

फ्लाइट IC-814

IC-814, एअरबस 300 हे विमान नेपाळमधील काठमांडू इथल्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 24 डिसेंबर 1999 रोजी नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करणार होतं.

हे सुद्धा वाचा

‘IC 814 हायजॅक्ड: द इन्साइड स्टोरी’

फ्लाइट इंजिनीअर अली. के. जग्गिया आणि पत्रकार सौरभ शुक्ला यांनी मिळून ‘IC 814 हायजॅक्ड: द इन्साइड स्टोरी’ हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात जग्गिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास विमानात बसले होते. या विमानात 11 क्रू मेंबर्स होते. 4.39 मिनिटांनी ते विमान भारतीय हवाई हद्दीत पोहोचलं होतं आणि कॉकपिटमध्ये बसलेले पायलट, को-पायलट हे चहा-कॉपी पित होते. विमानसेवक अनिल शर्मा जेव्हा तिथून बाहेर पडत होते, तेव्हा एका घुसखोऱ्याने त्यांना ढकलून आत प्रवेश केला. हे पाहून कॅप्टन देवी शरण आणि जग्गिया यांना मोठा धक्का बसला होता.

“त्या घुसखोऱ्याला पाहताचक्षणी आम्हाला समजलं होतं की काहीतरी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याचा चेहरा लाल रंगाच्या मास्कने झाकला होता. मंकी कॅप घालून त्याने डोळ्यांवर फोटोक्रोमॅटिक लेन्स लावले होते. त्या व्यक्तीच्या डाव्या हातात ग्रेनेड आणि उजव्या हातात रिव्हॉल्वर होती. तो मोठमोठ्याने ओरडत होता की, कोई होशियारी नहीं करेगा. कोई हिलेगा नहीं. तय्यारा हमारे कब्जे मे है (कोणी हुशारी करणार नाही, कोणी जागेवरून हलणार नाही. हे विमान आमच्या ताब्यात आहे.)”, अशा शब्दांत घटनेचं वर्णन जग्गिया यांनी पुस्तकात केलं होतं. संध्याकाळी 4.53 वाजता विमान हायजॅक झालं. या विमानातील हायजॅकर्स एकमेकांना टोपणनावाने हाक मारायचे. चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी ही टोपणनावं होती.

अमृतसर- सगळं चुकलं ते एकाच ठिकाणी

1 मार्च 2000 रोजी संसदेत तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) सगळ्यात आधी संध्याकाळी 4.56 वाजता हायजॅकची माहिती मिळाली होती. विमानातील पायलट कॅप्टन देवी शरण यांनी हायजॅकर्सच्या नकळत एक कोडेड संदेश पाठवला होता. देवी शरण यांना दहशतवाद्यांनी ते विमान लाहोरला नेण्यास भाग पाडलं होतं. परंतु एटीसीने ते विमान लाहोरमध्ये उतरवण्यास परवानगी नाकारल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते विमान अमृतसरला पोहोचलं होतं. तिथे अपहरणकर्त्यांनी विमानात इंधन भरण्याची मागणी केली.

पंजाबचे तत्कालीन पोलीस महासंचालक (डीजीपी) सरबजीत सिंग हे सेंट्रल क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपशी (CMG) संवाद साधत होते. नवी दिल्लीतील एटीसीमध्ये केंद्रीय समितीच्या सहाय्याने हायजॅकच्या घटनेवर तोडगा काढण्यासाठी काही सदस्य नेमले गेले. या सदस्यांमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) एच. एस. खोला, वरिष्ठ गुप्तचर, सुरक्षा अधिकारी आणि विमान वाहतूक तज्ज्ञ यांचा समावेश होता.

सरबजीत सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन संचालक श्यामल दत्त यांनी विमानाला रोखण्याचे मार्ग विचारले होते. “त्यातच एक सल्ला असा देण्यात आला होता की कदाचित विमानाच्या टायर्सवर गोळी झाडून ते पंक्चर करू शकतो. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. कारण ते काही सायकलचे टायर्स नव्हते. ते मोठमोठे ट्युबलेस टायर्स होते. त्यांना पंक्चर करण्याचा प्रयत्न केल्यास मोठा स्फोटही होऊ शकला असता”, असं त्यांनी सांगितलं.

माजी रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे (RAW) प्रमुख आणि सेंट्रल क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपचे (CMG) सदस्य ए. एस. दुलत यांनी एका मुलाखतीत सांगितलं की सीएमजीकडूनही कोणताही निश्चित उपाय सांगण्यात आला नव्हता. दुलत म्हणाले, “गृहमंत्री आले, प्रधान सचिव, NSA (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) आले, पण कोणीही काहीच ठरवलं नाही… आणि मग आम्ही डीजीपी पंजाब सरबजीत सिंह यांना दोष दिला. ते म्हणाले होते की, माझे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी मला सांगितलंय की त्यांना अमृतसरमध्ये कोणताही रक्तपात नकोय. जर त्यांना इथून जायचं असेल तर जाऊ द्या. पण दिल्लीनेही कोणताही निर्णय घेतला नव्हता आणि अमृतसरहून विमानाने उड्डाण केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना दोष दिला.”

अमृतसरहून लाहोरकडे उड्डाण

भारतात विमान असताना ते रोखण्यासाठी सरकारने जलदगतीने कारवाई केली नाही, असे आरोप भारत सरकारवर करण्यात आले. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो दिल्लीहून अमृतसरच्या दिशेने निघाले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी विमानाला अमृतसरमध्ये थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपहरणकर्त्यांना इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ संशयास्पद वाटला आणि त्यांनी पायलटला विमान उड्डाण करण्याचे आदेश दिली. विमान उड्डाण न केल्यास ओलिसांना ठार मारण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे जवळपास 47 मिनिटांते ते विमान अमृतसरहून निघालं. रात्री 8.01 वाजता ते विमान लाहोरला उतरलं. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विमानाच्या लँडिंगसाठी परवानगी नाकारली होती. पण जेव्हा पायलटने एटीसी लाहोरला सांगितलं की इंधन संपल्यामुळे विमानाचं क्रॅश-लँड करण्यास भाग पाडलं जाईल, तेव्हाच त्यांनी लँडिंगची परवानगी दिली होती, असं परराष्ट्र मंत्र्यांच्या निवेदनात म्हटलंय. त्यानंतर विमानात लाहोरमध्ये इंधन भरण्यात आलं.

लाहोरहून दुबई आणि नंतर थेट कंदाहारात

इंधन भरल्यानंतर रात्री 10.32 वाजता ते विमान अफगाणिस्तानातील काबुलसाठी निघालं होतं. मात्र काबुलने त्यांना कळवलं होतं की रात्री लँडिंगची कोणतीही सोय नाही. त्यामुळे ते विमान दुबईकडे वळवण्यात आलं होतं. अखेर 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1.32 वाजता ते विमान दुबईत उतरलं. युएई अधिकारी आणि अपहरणकर्ते यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्याठिकाणी 27 प्रवाशांची सुटका करण्यात आली होती. युएईमधील अल मिन्हाद विमानतळावर अपहरणकर्त्यांनी 27 प्रवाशांना सोडलं. त्यात 25 वर्षीय प्रवासी रुपिन कात्यालच्या मृतदेहाचाही समावेश होता. विमानात जहूर मिस्त्रीया या एका अपहरणकर्त्याने रुपिनवर प्राणघातक वार करून त्याची हत्या केली होती. दुबईत सुटका झालेले प्रवासी नंतर विशेष विमानाने भारतात पोहोचले होते. त्यानंतर अपहरण केलेलं विमान अफगाणिस्तानातील कंदाहार इथं नेण्यात आलं होतं. त्याठिकाणी तालिबानचं राज्य होतं.

अखेरची चर्चा

दुबईहून ते विमान पहाटे 6.20 वाजता निघालं आणि अफगाणिस्तानातील कंदाहार विमानतळावर ते सकाळी 8.33 वाजताच्या सुमारास पोहोचलं होतं. 31 डिसेंबर रोजी हायजॅकची घटना संपुष्टात येईपर्यंत ते विमान तिथेच होतं. तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंह म्हणाले की तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना त्या प्रदेशातील इतर देशांशी संपर्क साधावा लागला होता. 27 आणि 31 डिसेंबर दरम्यान अपहरणकर्ते आणि भारतीय अधिकारी यांच्यात थेट चर्चा झाली होती. जसवंत सिंह हे स्वत: कंदाहारला गेले होते.

दहशतवाद्यांच्या मागण्या

सुरुवातील अपहरणकर्त्यांनी मसूद अझहरसह भारतात पकडलेल्या 36 दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. याशिवाय त्यांनी हरकत-उल-मुजाहिदीन (HUM) नेता साजाद अफघाणीचा मृतदेह आणि 200 युएस डॉलर्सचीही मागणी केली होती.

एमईएनं दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारसुद्धा या चर्चेत सहभागी होतं. त्यांनी अपहरणकर्त्यांना समजावलं होतं की पैशांची आणि साजाद अफघाणीच्या शवपेटीची मागणी हे गैरइस्लामिक आहेत. त्यामुळे अपहरणकर्त्यांकडून ती मागणी मागे घेण्यात आली होती, असं एमईएनं स्पष्ट केलं होतं. अखेर तालिबानने अपहरणकर्त्यांना खंडणीची मागणी मागे घेण्यास आणि तीन अतिरेक्यांच्या सुटकेस सहमती दर्शवण्यास सांगितलं होतं.

अखेर भारत सरकारने मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख या तीन दहशतवाद्यांची सुटका केली. त्यानंतर हायजॅक केलेलं विमान त्यांच्याच अखत्यारीत असेल असं तालिबानने म्हटलं होतं. ओलिस असलेले प्रवासी आणि कर्मचारी दोन विशेष विमानांद्वारे दिल्लीला पोहोचले. 1 जानेवारी 2000 रोजी हायजॅक झालेलं विमान नवी दिल्लीला परतलं होतं.

हायजॅकनंतरच्या घटना

हायजॅकच्या घटनेनंतर भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं होतं, “अपहरणाच्या घटनेनं पुन्हा एकदा भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या संघटनांचा सहभाग अधोरेखित झाला आहे. पोलिसांनी मुंबईत पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स एजन्सीच्या (ISI) चार ऑपरेटिव्ह्सना अटक केली. हे ऑपरेटिव्ह्स एचयूएमचे (HuM) होते. त्यांच्या चौकशीदरम्यान हे स्पष्ट झालंय की पाकिस्तानच्या आयएसआयने हरकतच्या मदतीने हे अपहरण घडवून आणलं होतं. पाचही अपहरणकर्ते पाकिस्तानी असल्याची माहिती पुढे आली आहे. अपहरणकर्ते आता पाकिस्तानात असल्याचं कळतंय.”

भारत सरकारवर टीका

कंदाहार हायजॅकिंगच्या घटनेनं तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकार अडचणीत आलं होतं. सरकारवर दबाव वाढत होता. विमानात ओलिस असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक निदर्शनं करत होते. कंदाहार करारचा भाग म्हणून तीन दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल भारतावर टीकाही झाली. विशेष म्हणजे त्या विमानाला भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडण्याची परवानगी दिल्याने संकट आणखी वाढलं, अशी टीका भाजप सरकारवर झाली होती. किंबहुना अशी टीका आजवरही होते.

तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वाजपेयी मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आरोपांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. “जे कोणी सरकारच्या निर्णयावर टीका करत आहेत, त्यांनी उघडपणे समोर यावं आणि म्हणावं की आम्ही विमानातील प्रवाशांच्या प्राणाचं बलिदान द्यायला पाहिजे होतं, पण दहशतवाद्यांना सोडलं पाहिजे नव्हतं. दहशतवाद्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जेवढ्या कमी करता येईल तेवढं कमी करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्हाला त्यांच्या कमीत कमी मागण्या मान्य कराव्याच लागल्या होत्या”, असं ते म्हणाले होते.

दहशतवाद्यांचं पुढे काय झालं?

अपहरणकर्त्यांना आणि सुटका केलेल्या दहशतवाद्यांना कायद्यानुसार गुन्हेगार मानावं असं भारत सरकारने सांगूनही तालिबानने त्यांना 10 तासांतच अफगाणिस्तान सोडण्याची परवानगी दिली. तालिबानने त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला. दहशतवादी मसूद अझहरने नंतर जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेची स्थापना केली. जैशने भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.