प्रीतम, जानकर आणि नंतर पंकजा, का भगवानबाबांचा दसरा हा एका जातीचा नाही असं पुन्हा पुन्हा सांगतायत?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात काल दणक्यात दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री महादेव जानकर यांचीही भाषणे झाली. (know what is pankaja munde's politics behind dussehra rally?)

प्रीतम, जानकर आणि नंतर पंकजा, का भगवानबाबांचा दसरा हा एका जातीचा नाही असं पुन्हा पुन्हा सांगतायत?
pankaja munde

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात काल दणक्यात दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे आणि माजी मंत्री महादेव जानकर यांचीही भाषणे झाली. या तिघांच्या भाषणात एक समान धागा होता. तो म्हणजे भगवान भक्ती गडावर होत असलेला हा दसरा मेळावा एका जातीचा नाही. हा सर्व समावेशक मेळावा आहे. या तिन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात याच मुद्द्यावर अधिक जोर दिला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडे या आपलं नेतृत्व विस्तारत आहेत का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

मगाशी माझं हेलिकॉप्टर उडलं, परत खाली बसलं. तुम्हाला कदाचित काळजी वाटली असेल. मला वाटलं कुणाची दृष्ट लागली की मेळाव्याला. सकाळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा बघत होते. सन्मानीय परमपूज्यनीय मोहन भागवत यांचं भाषण ऐकत होते. ते संदेश देत होते की, या देशात भेदभाव व्हायला नको. अरे मुंडे साहेबांनी राजकारण सुद्धा त्याच्यावरच केलं की, हा भेदभाव मिटला पाहिजे. या मंचावर कोण नाहीय? सगळ्या जाती-धर्माचे, विचारांचे आहेत. या मंचावर पोहोचलेला माणूस कष्ट करुन पोहोचला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला मुंडे साहेबांनी शिकवलंय आपण ज्या मातीत जन्माला येतो, त्या मातीचा, जातीचा अपमान वाटता कामा नये. जो मोठ्या जातीत जन्म घेतो, राजघराण्यात जन्म घेतो त्यांना सुद्धा गर्व वाटू नये. आणि जो गरीब, बिछड्या जातीत, वंचितांमध्ये जन्म घेतो त्याचीसुद्धा मान खाली जायला नको. यासाठी या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात, महामानव डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आज जी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झालीय त्या परिस्थितीला दिशा देण्यासाठी भक्ती आणि शक्तीची परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मताचं राजकारण नाही. सामान्य, वंचिताची चळवळ इथून ऊर्जा घेते. छोटीची ज्योत ही मोठी मशाल बनून पूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यात जाते, असंही त्या म्हणाल्या.

हा राजकीय मेळावा नाही: प्रीतम मुंडे

आज इथे आलेला प्रत्येक माणूस मनामध्ये अपेक्षा घेऊन आला आहे. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. कारण मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाही. तर इथे आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला, मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आज मंचावर उपस्थित राहिलेले मान्यवर, सकाळपासून आलेले तुम्ही सर्व मुंडे परिवाराचा भाग आहात. आपला मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही. तर हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. इथे आल्यानंतर ऊर्जा मिळते, असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.

राजकीय प्रोग्राम नाही: जानकर

आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंची शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. पंकजा मुंडेंच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. सावरगावची निर्मिती कुणी केली. हू ईज क्रिएटर ऑफ सावरगाव. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का ? आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले.

तोपर्यंत मेळावे फक्त शक्तीप्रदर्शन ठरतील

पंकजा मुंडेंचा शक्तीप्रदर्शनाचा वार्षिक कार्यक्रम असतो. त्यातही पंकजा मुंडेंसाठी किती लोक आले होते आणि भगवानबाबांच्या दर्शनासाठी म्हणून किती आले होते हा भाग वेगळा आहे. भाजपला हे पुरेपूर माहीत आहे की पंकजा मुंडे कोणत्याही परिस्थितीत आता लगेच पक्ष सोडून जाणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय जबाबदाऱ्या देऊन त्यांना गुंतवण्यात आलं होतं. आता शक्तीप्रदर्शनातून त्या अधूनमधून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला राज्यातील फडणवीस सारख्या नेत्यांना इशारे देत असतात. परंतु भाजप नेत्यांनाही त्यांच्या मर्यादा समजल्या आहेत. त्यांना काऊंटर करायला भागवत कराड सारखे त्याच समाजातील दुसरे नेते मोठे करायला सुरुवात केली आहे. लोकसभेतून दुसऱ्यांदा निवडून आल्यावरही प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न देता नवख्या भागवत कराडांना संधी देऊन भाजपने पंकजा मुंडेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तुम्ही कितीही ओरडला तरी आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही असं भाजपचं धोरण दिसतंय. पंकजा मुंडे यांचा स्वत:चा विधानसभेत पराभव झाल्यामुळे त्यांची पॉलिटकल बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. जोपर्यंत त्या विजयी होत नाही आणि त्यांच्या समर्थकांना विजयी करत नाहीत तोपर्यंत त्यांचे मेळावे फक्त शक्तीप्रदर्शन राहतील. त्यातून फार काही दबाव निर्माण होणार नाही, असं राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार यांनी सांगितलं.

सहजासहजी मैदान सोडणार नाहीत

महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरही प्रमोद चुंचुवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंकजा या राष्ट्रीय राजकारणात जातील असं वाटत नाही. त्यांची बहीण राष्ट्रीय राजकारणात आहेत. महाराष्ट्र सोडून त्या राष्ट्रीय राजकारणात गेल्यास तो फडणवीसांचा विजय ठरेल. फडणवीसांना रान मोकळं मिळेल. त्यामुळे रान मोकळं करणारे संकेत पंकजा मुंडे देणार नाहीत. त्या सहजासहजी मैदान सोडणार नाहीत. त्या चिवटपणे लढत राहतील. मात्र, त्यांचं नेतृत्व विस्तारेल असं दिसत नाही, असं चुंचुवार यांनी स्पष्ट केलं.

नेतृत्व विस्तारने शक्य नाही

पंकजा मुंडे या वंजारी समाजाच्या नेत्या आणि ऊस तोडकामगारांच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ओबीसी नेत्या म्हणूनही त्यांना व्यापकता मिळालेली नाही. गोपीनाथ मुंडे हे सर्वव्यापी नेते होते. त्यांना कधीच जातीच्या चौकटीतून पाहिलं गेलं नाही. त्यांचं राजकारणही तसंच सर्वसमावेशक होतं. पण पंकजा मुंडे यांना अजून या कक्षा विस्तारता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कालच्या भाषणात त्या हा मेळावा कोणत्याही जातीधर्माचा नाही असं सांगत असल्या तरी संपूर्ण मेळाव्यातून त्या एका वर्गाचं प्रतिनिधीत्व करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे त्यांना जर नेतृत्व विस्तार करायचा असेल तर तसे कार्यक्रमही हाती घ्यावे लागतील, असंही काही राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?

पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो? जानकरांची फटकेबाजी

(know what is pankaja munde’s politics behind dussehra rally?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI