महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील 17 मतदारसंघातील 17 रंजक गोष्टी

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या 17 मतदारसंघात उद्या मतदान पार पडेल. या …

महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील 17 मतदारसंघातील 17 रंजक गोष्टी

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या 17 मतदारसंघात उद्या मतदान पार पडेल. या सर्व मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होणार आहेत.

Picture

मावळ : पार्थ पवारांच्या रुपाने अजित पवारांची प्रतिष्ठ पणाला

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून राष्ट्रवादीकडून लढत आहेत. पार्थ पवार यांच्या एन्ट्रीमुळे मावळची जागा राज्यभरात लक्षवेधी ठरली आहे. मावळ हा शिवसेनेचा गड आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे इथून विद्यमान खासदार आहेत. मात्र, इथे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. याचा फायदा पार्थ पवारांना होऊ शकतो. शिवाय, अजित पवार यांनीही मुलासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे. त्यात शेकापने सुद्धा पार्थ पवारांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.

27/04/2019,11:01AM
Picture

शिरुर : सिनेअभिनेते अमोल कोल्हे रिंगणात

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या आराध्य दैवातांवरील मालिकांमुळे प्रसिद्धीस आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिरुर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. अमोल कोल्हे हे आधी शिवसेनेत होते. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करत, शिरुरमधून ते शिवसेनेचे विद्यामन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्कर देत आहेत. अमोल कोल्हे यांच्यासमोर मोठं आव्हान असलं, तरी मूळचे शिरुरमधील असलेल्या अमोल कोल्हे यांची या भागात लोकप्रियताही मोठी आहे.

27/04/2019,11:02AM
Picture

शिर्डी : थोरत-विखे गटाचा प्रभाव

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सदाशीव लोखंडे, तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे रिंगणात आहेत. मात्र, नगरमधील प्रसिद्ध थोरात-विखे वाद या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसेल. कारण मुलासाठी नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने विखे पाटील नाराज आहेत. विरोधी पक्षनेते पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी शिर्डी मतदारसंघातील निकालातून दिसून येईल का आणि थोरात आपली किती ताकद पणाला लावणार, हेही पाहावे लागणार आहे.

27/04/2019,11:02AM
Picture

उत्तर मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरमुळे लक्षवेधी लढत

उत्तर मुंबईत नेहमीच धक्कादायक निकाल पाहायला मिळतात. एकेकीकाळी या मतदारंसघातून भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा अभिनेता गोविंदा याने पराभव केला होता. गेल्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पराभूत करत, भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. यंदा काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांना तोडीस तोड टक्कर आहे. उर्मिला मातोंडकरने उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यात मराठी मतं तिच्यामुळे काँग्रेसकडे वळण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

27/04/2019,11:02AM
Picture

उत्तर पश्चिम मुंबई : गजानन कीर्तीकरांसमोर संजय निरुपमांचा आव्हान

गेल्यावेळी म्हणजे 2014 साली उत्तर मुंबईतून पराभूत झालेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे यंदा उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना टक्कर देणार आहेत. गजानन कीर्तीकर यांची प्रतिमा काम करणारे खासदार अशी आहे. मात्र, या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्य लक्षणीय आहे. त्यामुळे ही मतं कुणाच्या बाजूने झुकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

27/04/2019,11:03AM
Picture

उत्तर पूर्व मुंबई : सोमय्यांऐवजी कोटक, सेनेचं मनोमिलन?

उत्तर पूर्व मुंबईत महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला होता. विद्यमान भाजप खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट देण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला. त्यानंतर अखेर भाजपने माघार घेत सोमय्यांचं तिकीट कापलं आणि त्याठिकाणी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. मात्र, तरीही शिवसैनिकांची नाराजी दूर झाली का, हा प्रश्नच आहे. त्यात कोटक यांच्यासमोर संजय दिना पाटील यांच्या रुपाने मराठी उमेदवार राष्ट्रावादीकडून रिंगणात आहे. संजय दीना पाटील यांनी याआधी या मतदारसंघाचं नेतृत्त्वही केले आहे. मराठी आणि मुस्लीम मतदारांची संख्या उत्तर पूर्व मुंबईत लक्षणीय आहे. त्यामुले याचा परिणाम नक्कीच दिसून येईल.

27/04/2019,11:03AM
Picture

उत्तर मध्य मुंबई : माजी खासदार विरुद्ध विद्यमान खासदार

उत्तर मध्य मुंबईतू भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन, तर काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त अशी लढत होणार आहे. दोन दिग्गज नेत्यांच्या मुलींमधील ही लढत मुंबईती अत्यंत चुरशीची लढत मानली जाते. हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे होता. मात्र, 2014 साली मोदी लाटेत प्रिया दत्त यांना पराभूत करत पूनम महाजन यांनी या मतदारसंघात बाजी मारली. मात्र, पुन्हा एकदा प्रिया दत्त या पूनम महाजनांना टक्कर द्यायला तयार झाल्या आहेत.

27/04/2019,11:03AM
Picture

दक्षिण मध्य मुंबई : काँग्रेस पुन्हा गडावर ताबा मिळवणार?

दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं आहे. धारावी झोपडपट्टी या मतदारसंघातच येते. त्यामुळे काँग्रेससाठी मोठी व्होटबँक इथे आहे. मात्र, गेल्यावेळी मोदीलाटेत दक्षिण मध्य मुंबईतही काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला होता. यावेळी गणितं बदलणार की, राहुल शेवाळे पुन्हा जिंकणार, हे पाहावं लागेल.

27/04/2019,11:03AM
Picture

दक्षिण मुंबई : मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लक्षवेधी लढत

विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा शिवसेनेने दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरवले असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी खासदार मिलिंद देवरा हे लढत आहेत. मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईत राहणाऱ्या अनेक उद्योगपतींनी पाठिंबा दिला आहे. यात मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांचाही समावेश आहे. एकीकडे उच्चभ्रू आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय लोकांचा मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबईची ओळख आहे. शिवसेनेचे संघटनात्मक बांधणी या मतदारसंघात असली, तरी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे ‘दक्षिण मुंबई’ कुणाची, हे 23 मे रोजीच कळेल.

27/04/2019,11:03AM
Picture

नंदुरबार : सर्वात तरुण खासदार

नंदुरबारमधून डॉ. हिना गावित पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 साली त्या पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्या होत्या. डॉ. हिना गाविता या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या. 2014 साली डॉ. हिना यांनी सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या माणिकारव गावित यांना तब्बल एक लाखांहून अदिक मतांनी पराभूत केले होते. यंदा काँग्रेसच्या के. सी. पडवी यांच्याशी डॉ. हिना गावित यांची मुख्य लढत होणार आहे.

27/04/2019,11:04AM
Picture

धुळे : अनिल गोटेंमुळे निवडणुकीला रंगत

भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून लढत आहेत. धुळे ग्रामीणचे काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्याशी भामरेंचा समाना होणरा आहे. यंदा धुळ्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अनिल गोटे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

27/04/2019,11:04AM
Picture

दिंडोरी : भाजपकडून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांना तिकीट

भाजपने दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्त कट करुन, राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार यांना पक्षात घेऊन भाजपने तिकीट दिलं. त्यामुळे हरिश्चंद्र पवार नाराज आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे धनराज महाले आणि माकपकडून जे. पी. गावित रिंगणात आहेत. त्यामुळे इथे स्थानिक गणितंच प्रभावी ठरणार आहेत.

27/04/2019,11:04AM
Picture

नाशिक : पुन्हा एकदा 'भुजबळ' रिंगणात

नाशिकची लढत पुन्हा एकदा चुरशीची होणार आहे. कारण इथून पुन्हा एकदा ‘भुजबळ’ रिंगणात आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतण्या समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून, त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे उभे ठाकले आहेत. इथे मनसेने उघडपणे भुजबळांचा प्रचार केल्याने, या मतांचाही प्रभाव दिसून येईल.

27/04/2019,11:04AM
Picture

पालघर : तिकिटासाठी पक्षांतर करणाऱ्या गावितांना तिकीट

भाजपचे खासदार चिंतामण वनगांच्या निधनानंतर पालघर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित तिकिट मिळालं म्हणून भाजपवासी झाले व निवडूनही आले. मात्र, नंतर या जागेसाठी शिवसेना अडून बसल्याने, राजेंद्र गावित भाजप सोडून शिवसेनेत आले आहेत. त्यांना तिकीटही देण्यात आलं. मात्र, आता त्यांच्यासमोर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून माजी खासदार बळीराम जाधव उभे आहेत. त्यामुळे लढत रंगत होणार, हे निश्चित.

27/04/2019,11:05AM
Picture

भिवंडी : अंतर्गत वादामुळे गाजलेला मतदारसंघ

भाजपकडून विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, कपिल पाटलांवर स्थानिक शिवसैनिकांची नाराजी आहे. शिवसेना भिवंडीच्या जागेवर अडून बसली होती. मात्र, भाजपने जागा सोडली नाही. त्यामुळे भिवंडीत अंतर्गत वाद प्रचंड झाले. त्यांची चर्चाही झाली. दुसरीकडे, सुरेश टावरेंना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने, काँग्रेसमधीलही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. एकंदरीत आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत वादाचा परिणाम काय होतो, हे या निवडणुकीत दिसून येईल.

27/04/2019,11:05AM
Picture

कल्याण : डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा रिंगणात

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे लढत आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे या मतदारसंघात जड आहे. राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याने, श्रीकांत शिंदेंसाठी सोपी जाणारी ही निवडणूक आहे.

27/04/2019,11:05AM
Picture

ठाणे : शिवसेना बालेकिल्ला राखणार?

ठाण्यात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा विद्यमान खासदार राजन विचारे यांना सेनेने तिकीट दिलं आहे. राजन विचारेंचा जनसंपर्क दांडगा असून, ठाण्यात शिवसेनेची संघटना बांधणीही उत्तम मानली जाते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा शिवसेनेला दरवेळी होत आला आहे.

27/04/2019,11:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *