दिपाली सय्यद पोहोचल्या पुण्यातील आंदोलनात, पण विद्यार्थ्यांनी केला विरोध, नेमकं काय घडलं?
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिपाली सय्यद गेल्या होत्या. पण त्यांचे भाषण ऐकून विद्यार्थी संतापले.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या आंदोलनात अभिनेत्री दीपाली सय्यद पोहोचली होती. तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा देत भाषण केले. मात्र त्यांच्या काही वक्तव्यांनंतर विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध दर्शविला आणि शेवटी त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.
दीपाली सय्यद यांनी सुरुवातीला म्हटले की, कोल्हापूरच्या सुपुत्राचा आवाज आता घराघरांत गाजत आहे. हा लढा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून उदयास आलेला हा विवेकानंद आपल्या बोलीतून सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड करत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही महाराष्ट्राचे भविष्य आहात. संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही आणि तुमचा हा संघर्ष वाया जाणार नाही.
“हे सर्व सामान्यांचे सरकार आहे”
आपल्या मागील अनुभवाचा उल्लेख करताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, २०१७ मध्ये त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी उपोषण केले होते. अहिल्यानगरमध्ये त्यांनी चार दिवस उपोषण केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, माझे ऐकून घ्या आणि या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका. मात्र जेव्हा त्यांनी “हे सर्व सामान्यांचे सरकार आहे” असे विधान केले, तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. नारेबाजी आणि विरोध सुरू झाला.
दीपाली सय्यद यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले. तरीही विरोध कायम राहिला. विद्यार्थ्यांच्या तीव्र नाराजीमुळे दीपाली सय्यद यांना भाषण अर्ध्यातच आटोपते घ्यावे लागले. विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी ठाम आहेत आणि कोणत्याही राजकीय रंगछटांना ते स्वीकारायला तयार नाहीत, हे या घटनेतून दिसून आले.
