बांगड्या वाद : आधी आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, आता अमृता फडणवीसांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्यांवरुन केलेल्या वक्तव्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं, त्यानंतर अमृता फडणवीसांनीही या वादात उडी घेतली आहे

बांगड्या वाद : आधी आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, आता अमृता फडणवीसांचा पलटवार

मुंबई : बांगड्या भरण्याबाबत वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात आता मिसेस फडणवीसांनीही उडी घेतली आहे. रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं. (Amruta Fadnavis on Aditya Thackeray)

‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत दिलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, पती देवेंद्र फडणवीस आणि भाजपला त्यांनी मेन्शन केलं आहे.


शिवसेना-भाजप युतीत फूट पडल्यानंतर अमृता फडणवीसांनी मेट्रोसाठी झालेल्या वृक्षतोडीच्या मुद्दयावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कानपिचक्या लगावल्या होत्या. फडणवीस आणि ठाकरे यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असतानाही फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यातच आता मिसेस फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.

काय आहे प्रकरण?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्यांवरुन केलेल्या वक्तव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं’. त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं.

सहसा मी प्रत्युत्तर देत नाही, पण.., बांगड्यांबाबतच्या विधानावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर!

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

माजी आमदार वारिस पठाण यांच्या 100 कोटी विरुद्ध 15 कोटीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेला घेरलं होतं. आमचा हिंदू समाज सहिष्णू आहे, मात्र त्याला आमची दुर्बलता समजून असा कोणी लावारीस बोलत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही.

“शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हटलं तर बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिला कार्यकर्त्यांना आवडत नाही आणि म्हणून मी तो वापरणार नाही. मात्र, शिवसेना मूग गिळून बसली असेल, तरी आम्ही मूग गिळून बसणार नाही”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

भाजपने महाआघाडी सरकारविरोधात काल राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं होतं. राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलनं झाल्याचा दावा भाजपने केला. मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व भाजप दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. (Amruta Fadnavis on Aditya Thackeray)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI