आसाममध्ये कोणीही राहू शकते, मला माहीत नाही महाराष्ट्राचे आमदार राज्यात आहेत की नाही, मुख्यमंत्री सरमांचे शरद पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आसाममध्ये कोणीही राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये आहेत की नाही, हे आपल्याला माहीत नसल्याचे सरमा यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी शरद पवार यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आसाममध्ये अनेक चांगले हॉटेल आहेत, या हॉटेलमध्ये कोणीही राहू शकते. मला माहित नाही की महाराष्ट्राचे (Maharashtra) आमदार आसाममध्ये आहेत की नाही, असं हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. दरम्यान गुरुवारी राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. सगळ्यांना माहित आहे, शिवसेनेचे बंडखोर आमदार आधी सुरतला कसे गेले? नंतर त्यांना सुरतवरून आसामला कोणी नेले. त्यांचं नाव घेण्याची गरज नाही. या बंडखोर आमदारांना सध्या आसाम सरकार मदत करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या या टीकेला आमसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये आहे की नाही हे आपल्याला माहीत नसल्याचे सरमा यांनी म्हटले आहे.
सरकार बहूमत सिद्ध करेल
पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटले होते, की महाविकास आघाडीच्या भाग्याचा निर्णय हा विधानसभेतच होईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आपले बहुमत सिद्ध करेल. शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपच मदत करत असल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पोलीस आणि गृह मंत्रालयावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात एवढी मोठी घटना घडते आणि याची साधी खबर पण पोलिसांना कशी काय लागली नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेचे तब्बल 41 आमदार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर शिंदे गटाला सहा अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटाकडे 47 आमदारांचे संख्याबळ झाले आहे. याच संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे आम्ही बहुमत सिद्ध करू असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र सध्या तरी हाती येत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडे अवघे 15 च आमदार राहिले आहेत. यातील काही आमदार देखील शिंदे गटात सहभागी होऊ शकतात अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
