‘माणुसकी खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार’, भातखळकरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या या स्थगितीच्या निर्णयावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केलीय. माणुसकी खड्ड्यात, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर तोफ डागलीय.

'माणुसकी खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार', भातखळकरांचा हल्लाबोल
भाजप आमदार अतुल भातखळकर, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या 100 सदनिका देण्याच्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी, असा शेरा मारत या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या स्थगितीच्या निर्णयावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केलीय. माणुसकी खड्ड्यात, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर तोफ डागलीय. (Atul Bhatkhalkar criticizes uddhav Thackeray for postponing jitendra awhad’s decision)

“गृहनिर्माणमंत्री जितेंद्रआव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता. परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला. माणुसकी खड्ड्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत. आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे”, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलीय.

नेमकं प्रकरण काय?

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, आता या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर या निर्णयाला स्थगिती मिळाल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केलीय.

संबंधित बातम्या :

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

Atul Bhatkhalkar criticizes uddhav Thackeray for postponing jitendra awhad’s decision

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI