“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा घणाघात

लॉकडाऊन प्रकरणी चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केलीय. जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतात, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

"इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो", शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा घणाघात
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण औरंगाबाद प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय आहे. अशावेळी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील लॉकडाऊनवरुन AIMIM खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. लॉकडाऊन प्रकरणी चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केलीय. जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतात, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय. (Chandrakant Khaire criticizes MP Imtiaz Jalil over lockdown)

इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो. तो दुकाने उघडायला आला तर शिवसैनिक उत्तर देतील. लॉकडाऊन उघडलं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं सांगतानाच इम्तियाज जलीलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केलीय. खैरे यांच्या या टीकेमुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झालीय. औरंगाबादेत लॉकडाऊनवरुन यापूर्वीही AIMIM विरुद्ध शिवसेना असं चित्र पाहायला मिळालं आहे.

जलील यांचा लॉकडाऊनला विरोध

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी औरंगाबादेत महापालिका प्रशासनाकडून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात स्थानिक पातळीवर लॉकडाऊनची घोषणा केली होती. तेव्हा इम्जियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. लॉकडाऊन लागू केला आणि जलील यांनी आंदोलन पुकारलं तर औरंगाबादेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊनचा निर्णय स्थगित करण्याची घोषणा केली. तेव्हा जलील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष केला होता.

इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी

जलील यांनी केलेल्या जल्लोषानंतर चंद्रकांत खैरे यांनी कारवाईची मागणी केली होती. “औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली होती. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही त्यांनी दिला होता.

तेव्हा नेमकं काय घडलं?

औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला होता. औरंगाबादेतील कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली असताना खुद्द खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांनी केलेला जल्लोष धोकादायक होता.

संबंधित बातम्या :

औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथींना नोकरी, आस्तिककुमार पांडेय यांचा स्तुत्य निर्णय

रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकानं उघडण्यास परवानगी द्या, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

Chandrakant Khaire criticizes MP Imtiaz Jalil over lockdown

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI