ते राजकारणाचं जाऊ दे, जेव्हा अवधूत गुप्तेंना जयंत पाटलांची चूक ‘खुपते’

जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये मराठी व्याकरणात केलेली चूक अवधूत गुप्तेंनी लक्षात आणून दिली.

ते राजकारणाचं जाऊ दे, जेव्हा अवधूत गुप्तेंना जयंत पाटलांची चूक 'खुपते'

मुंबई : भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशा सत्ताधारी आणि विरोधातील पक्षांची निवडणूक कॅम्पेन साँग तयार करणारे हरहुन्नरी गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये मराठी व्याकरणात केलेली चूक अवधूत गुप्तेंनी (Avadhoot Gupte corrects Jayant Patil) लक्षात आणून दिली.

जयंत पाटील यांनी ट्विटवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या प्रसिद्ध वाक्यावरुन निशाणा साधला होता. ”मी पुन्हा येईल’ म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीये, म्हणूनच आता विरोधी पक्षातून आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करु’ असं ट्वीट जयंत पाटील यांनी काल (गुरुवारी) दुपारी केलं होतं.

हे ट्विट करताना जयंत पाटील यांच्याकडून व्याकरणाची गल्लत (Avadhoot Gupte corrects Jayant Patil) झाली. ‘येईन’ ऐवजी त्यांनी ‘येईल’ असं लिहिलं. ही चूक अवधूत गुप्ते यांनी निदर्शनास आणून दिली. ‘ते राजकाराणाचं जाऊ दे.. येई’न’ ऐवजी येई’ल’ कोण म्हणाले तेवढे सांगा!!’ असा टोला गुप्तेंनी हाणला. त्यापुढे टॉमेटोसारख्या लालबुंद चिडलेल्या चार इमोजी टाकायलाही अवधूत गुप्ते विसरले नाहीत.

गंमत म्हणजे राजकारण हा शब्द लिहिताना अवधूत गुप्तेही चुकले आहेत. ‘राजकाराणा’ असा शब्द अवधूत गुप्तेंनी लिहिला आहे.

अवधूत गुप्ते सध्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या संगीत रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या पर्वाचं परीक्षण करतात. त्यांचे सहपरीक्षक महेश काळे यांच्याकडून अनेक वेळा प्रेक्षकांना शुद्ध मराठी भाषेत परीक्षण ऐकण्याची संधी मिळते. आता अवधूत गुप्तेही मराठी भाषेत चूक करणाऱ्या नेतेमंडळींची शाळा (Avadhoot Gupte corrects Jayant Patil) घेणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हेही वाचा : एखादा आमदार फुटलाच तर…. : जयंत पाटील

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI