एखादा आमदार फुटलाच तर.... : जयंत पाटील

जर एखादा आमदार फुटला तर आम्ही त्याला सर्वजण एकत्र येऊन पराभूत करु, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील (NCP leader jayant patil) यांनी सांगितले.

एखादा आमदार फुटलाच तर.... : जयंत पाटील

पुणे : जर एखादा आमदार फुटला तर आम्ही त्याला सर्वजण एकत्र येऊन पराभूत करु, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील (NCP leader jayant patil) यांनी सांगितले. आज (7 नोव्हेंबर) पुणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर आपले मत व्यक्त केले.

काही आमदारांना आमिष दाखवायला सुरुवात झाली आहे. जर एखादा आमदार फुटला तर इतर सर्व पक्ष एकत्र येतील आणि त्या आमदाराला पराभूत करतील. मला वाटत नाही राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटेल. आमची जी काही फुटाफुटी होती ती पूर्वी झालेली आहे. त्यामुळे आता नव्याने निवडून आलेले नवे चेहरे आहेत. जनतेच्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरलेली ही लोकं आहेत, असं जयंत पाटील (NCP leader jayant patil) यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही

आमची कोणतीही चर्चा शिवसेनेसोबत झालेली नाही. आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहे. शिवेसेनेने आम्हाला कधी पाठिंबा मागितला नाही आणि आम्ही कधी त्यांना देण्याचा विचारही केला नाही. भाजप आणि शिवसेनेतून काय ठरतंय याचा प्रश्न आहे. प्रसार माध्यमातून इतर पक्ष शिवेसेनेला पाठिंबा देणार का, या चर्चा करण्याची गरज नाही, असं पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेने मागितलेला समान वाटा जर भाजपने दिला तर राष्ट्रपती राजवट लागणार नाही. जे ठरलेलं आहे ते भारतीय जनता पक्ष आता का करत नाही असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे, असं पाटील म्हणाले.

बहुमत भाजप-शिवसेनेला मिळालेले आहे. त्या दोघांनी येऊन सरकार स्थापन केले पाहिजे. आमच ठरंलय असं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आधी सांगितले होते. आता ती डायलॉगबाजी खरी ठरली तर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि 50 टक्के मंत्रिपद शिवसेनेला दिले पाहिजे, असंही यावेळी पाटील म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन मोठा संघर्ष शिवसेना भाजपमध्ये दिसत आहे. तसेच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच शिवेसेनेला आमदार फुटण्याची भीती असल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व आमदारांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, असंही सांगितलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *