ग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. प्राथमिक अंदाजानुसार या निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान झालं आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 15, 2021 | 9:16 PM

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. प्राथमिक अंदाजानुसार या निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान झालं आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (15 जानेवारी) दिली. राज्यातील एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे अंतिमतः 12,711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली (Average Voting percentage of Gram Panchayat Election in Maharashtra 2021).

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द झालीय. गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज आले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.

अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती, अशीही माहिती मदान यांनी दिली.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

  • निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
  • आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
  • एकूण प्रभाग- 46,921
  • एकूण जागा- 1,25,709
  • प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
  • अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
  • वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
  • मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
  • बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
  • अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

हेही वाचा :

ग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार, उमेदवाराचं स्वत:लाच मतदान नाही!

महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद

मतदान पार पडलं, आता निकालाची प्रतिक्षा; उमेदवारांमध्ये धाकधूक, कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला!

व्हिडीओ पाहा :

Average Voting percentage of Gram Panchayat Election in Maharashtra 2021

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें