पहिली वेळ आहे, माफ आहे, आगे कुछ करेगा तो प्रहारचा वार… बच्चू कडूंचा इशारा काय?
मागच्या एका राज्यमंत्र्याच्या काळात मी एका वर्षात ११८२ बैठका घेतल्या. आम्ही गरिबांसाठी मंत्रिपदाचा फायदा घेतला. एक मेसेज आला तरी कामगाराच्या मेसेजवर मिटिंग लावल्या.

अमरावती: पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा गर्भित इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (bacchau kadu) यांनी आमदार रवी राणा (ravi rana) यांना त्यांचे नाव न घेता दिला. प्रहार संघटनेच्या (prahaar) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राणा यांचं नाव न घेता त्यांना इशारा दिला. तसेच राणा यांच्याबरोबरचा वाद संपुष्टात आल्याचं जाहीर केलं.
रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडतानाच राणा यांना कानपिचक्या दिल्या.
कोणी काय म्हटलं हा विषय महत्त्वाचा आहे. कारण अस्तित्वाचा आहे. कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
आम्ही गांधीजींना मानतोय. पण भगतसिंह आमच्या एवढ्या डोक्यात आहे की आमची कधी सटकते ते माहीतच पडत नाही. त्यामुळे त्याचाही विचार करा. आम्हीही अपशब्द बोलणार नाही. आम्हीही आचार संहिता पाळू. कुणाचं मन दुखावेल असं कधी करणार नाही. केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मंत्रिपदासाठी करतोय असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज सर्व पक्षात बंडखोर आहेत. जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंक्तीत आहेत. फेसबुकच्या कमेंटवर जाऊ नका. आजकाल अर्धा सोशल मीडिया पैशाने चालतो. खरी बाजू समोरच येत नाही. मला शेतकरी आंदोलनात मीडियाने एवढं चालवलं असतं तर शेतकऱ्यांच्या पाच सहा मागण्या पूर्ण केल्या असत्या, असा टोला त्यांनी मीडियाला लगावला.
मी पहिल्यांदा पाहिलं आठ दिवस मीच आहे. प्रहारच आहे. याला म्हणतात परिणाम. जो चलता है वही बिकता है, असंही ते म्हणाले.
मागच्या एका राज्यमंत्र्याच्या काळात मी एका वर्षात 1182 बैठका घेतल्या. आम्ही गरिबांसाठी मंत्रिपदाचा फायदा घेतला. एक मेसेज आला तरी कामगाराच्या मेसेजवर मिटिंग लावल्या. अनाथांचं आरक्षण मजबूत केलं. 9 अनाथांना नोकरी लावली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलन करावं आणि सत्तेत असलेल्यांनी सत्ता उपभोगावी हा गेमच आम्हाला पलटवून टाकायचा आहे. आम्हाला 10 आमदार निवडून आणायचे आहेत. आमच्या इशाऱ्यावर सरकार चाललं पाहिजे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
