राजकारणाने पातळी सोडली, ही अखेरची निवडणूक, ‘बविआ’चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय

निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक अखेरची असल्याचं 'बहुजन विकास आघाडी'चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलं.

राजकारणाने पातळी सोडली, ही अखेरची निवडणूक, 'बविआ'चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय

वसई : वसई तालुक्याची नाहक बदनामी होत असल्याचं सांगत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी यंदा लढवलेली निवडणूक अखेरची असल्याचं जाहीर केलं (Hitendra Thakur Retires from Election) आहे. मात्र राजकारण सोडणार नसून जनतेची साथ न सोडण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. माझ्या पत्नीला यावर भाष्य करावं लागलं. सौभाग्य आणि कोक संपवणाऱ्यांना जागा दाखवा, असं आवाहन करावं लागलं. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी खेद व्यक्त केला.

भावनिक किंवा मतदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी मी मतदानाच्या अगोदर हा निर्णय घेऊ शकलो असतो. पण मला लोकांना भावनिक करायचं नव्हतं, तर मेरिटवर निवडणुकीत विजय मिळवायचा होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

गुंड गुंडाचीच बाजू घेणार; प्रदीप शर्मांचा हितेंद्र ठाकूरांवर पलटवार

प्रदीप शर्मा यांनी राजीनामा दिला, तेव्हा आमचं फोनवर बोलणं झालं होतं. तेव्हा मला शर्मा म्हणाले की मला चांदिवलीवरुन लढायचं आहे, नालासोपाऱ्याला येणार नाही, परंतु मला जबरदस्तीने पाठवत आहेत, असाही दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. हितेंद्र यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवत आहेत.

वसई, नालासोपारा, बोईसर या तिन्ही सीट मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. आमचा एकही उमेदवार पडला, तर ईव्हीएम घोटाळा असेल, असाही दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.

वसई विधानसभा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर पुन्हा विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे विजय पाटील निवडणूक लढवत आहेत. परंतु निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक अखेरची असल्याचं ठाकूर यांनी जाहीर केलं.

या निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं या सर्वांनीच मला मदत केली असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. हितेंद्र ठाकूर यांचा ‘बविआ’ हा काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह महाआघाडीमध्ये आहे.

‘पूर्ण प्रचारात वसई तालुक्याला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. एक-दोन अपवाद वगळले तर महसूल, पोलिस प्रशासनातील लोकांनी प्रामाणिक काम केले. कार्यकर्ते माझा देव आहेत. माझ्याविरोधात कोणी बोललं की माझा कार्यकर्ता पेटून उठतो’ असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.

वसई तालुक्यातील जनता माझ्यावर, माझ्या पक्षावर प्रेम करते. जिकडे कमी पडलो असेन, जिथे काम झालं नसेल, ते सर्व करणार. हॉस्पिटल, पाणी या सुविधांचं काम करणार, यानंतर प्रत्येक पदावर फक्त माझा कार्यकर्ता बसणार, तर मी कार्यकर्ता होणार, माझा सक्षम कार्यकर्ता उद्याचा आमदार राहणार आहे, असंही हितेंद्र ठाकूर यांनी (Hitendra Thakur Retires from Election) सांगितलं.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्या-लागल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात फिरणार, एक वेगळा हितेंद्र ठाकूर लोकांना दाखवणार आणि पुन्हा वसई तालुक्यात येऊन माझा अपप्रचार करणाऱ्याला मी निश्चित जागा दाखवणार, असा निर्धारही हितेंद्र ठाकूरांनी बोलून दाखवला.

मला आता तालुक्याची बदनामी नको, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. मी शिवसेनेबरोबर कधीच नव्हतो. 124 जागांवर निवडणूक लढवणारा कधी सत्तेत बसू शकतो का? असा सवालच हितेंद्र ठाकूर यांनी केला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI