राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न : माणिकराव ठाकरे

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला (Maharashtra ReElections). तसेच, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला

राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न : माणिकराव ठाकरे

मुंबई : राज्याला पुन्हा निवडणुकीकडे ढकलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला (Maharashtra ReElections). तसेच, आम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला (Manikrao Thackeray on BJP).

राज्यात सध्या सत्ता संघर्षावरुन मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातही सत्तास्थापनेबाबत खलबतं सुरु आहेत.

काँग्रेसने महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व आमदारांना सध्या जयपूरमध्ये हलवलं आहे. यावर माणिकराव ठाकरे म्हणाले, “तिथे पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करुन सर्वांची मतं जाणून घेणार आहेत. त्याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आमदारांची बैठक घेतली. यावेळी पक्ष नेतृत्त्व सर्व आमदारांचं ऐकतील आणि त्यांचं म्हणणं हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर सोनिया गांधी या सर्व परिस्थितीवर जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल”.

महाराष्ट्रातील राजकारणाची एकूण परिस्थिती पाहता, भाजपची पावलं ही राज्याला निवडणुकीकडे ढकलण्याची असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही-9’शी बोलताना केला. “भाजप सध्या ज्याप्रकारे निर्णय घेत आहेत, त्यावरुन ‘आम्हाला नाही तर कोणालाच सरकार नाही’, अशी त्यांची भूमिका असल्याचं स्पष्ट होतं”, असा घणाघात यावेळी माणिकराव ठाकरे यांनी केला. तसेच, त्यासाठी ते राज्यावर पुन्हा निवडणुका लादण्याच्या प्रयत्नात आहेत, असंही ते म्हणाले. मात्र, सत्तेसाठी आमचे प्रयत्न नाहीत, राज्याची एकूणच परिस्थिती पाहता या परिस्थितीत काय करता येईल, यासाठी सर्व आमदारांची ही चर्चा घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा भाजपचा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, अशी भूमिका आमदारांची असल्याचंही ते म्हणाले.

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का?

भाजप किंवा शिवसेनेच्या विचारांशी आमचे विचार जुळणं शक्य नाही, मात्र आम्हाला राज्याची चिंता आहे, असं शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी माणिकराव ठाकरे म्हणाले. मात्र, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर हायकमांड निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय सर्वमान्य असेल, असंही त्यांनी सांगितलं. तरी यातून लवकरच मार्ग निघेल असंही त्यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *