‘सांगलीत राष्ट्रवादीकडून ‘टप्प्यात कार्यक्रम’, आता जळगावात सेनेचा भगवा; भाजपाला ओहोटीचे दिवस’

जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. | Jalgaon mahanagarpalika Mayor election

'सांगलीत राष्ट्रवादीकडून 'टप्प्यात कार्यक्रम', आता जळगावात सेनेचा भगवा; भाजपाला ओहोटीचे दिवस'
जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे

मुंबई: सांगलीत ‘टप्प्यात आल्यावर’ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यक्रम केला आणि आता जळगावात (Jalgaon) शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावत भाजपाला चांगलीच ओहोटी लावल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केले. (BJP loses in mayor election in Jalegaon Mahanagarpalika)

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ करत राष्ट्रवादीचा महापौर केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपाचा उधळलेला वारु आता ओहोटीच्या रुपात दिसू लागला असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे महेश तपासे यांनी म्हटले.

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.

ठाण्यातील ‘त्या’ हॉटेलमध्येही जल्लोषाचे वातावरण

इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षात भाजपची सत्ता आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र असे असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली.

या सर्व बंडखोर नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी हॉटेलमधूनच ऑनलाईन पद्धतीने मतदान पार पडले. त्या मतदानानंतर जळगाव महानगरपालिकेवर जयश्री महाजन या महापौर पदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत.

या विजयानंतर ठाण्यातील हॉटेलमध्ये भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी नगरसेवकांची जबाबदारी घेतली होती.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

जळगावात महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का; ऑनलाईन निवडणुकीला कोर्टाची परवानगी

(BJP loses in mayor election in Jalegaon Mahanagarpalika)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI