खडसे राज्याच्या राजकारणातून आऊट, भाजपचा बी प्लॅन ठरला?

मुक्ताईनगरमधून खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. एकनाथ खडसेंना भाजपच्या तिसऱ्या यादीतही स्थान देण्यात आलेलं नाही.

खडसे राज्याच्या राजकारणातून आऊट, भाजपचा बी प्लॅन ठरला?

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse Governor) राज्याच्या राजकारणापासून पूर्णपणे दूर होण्याची शक्यता आहे. कारण, सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंना राज्यपाल (Eknath Khadse Governor) बनवलं जाण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरमधून खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. एकनाथ खडसेंना भाजपच्या तिसऱ्या यादीतही स्थान देण्यात आलेलं नाही.

खडसेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न

एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या सून रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे. खडसेंच्या उमेदवारी संदर्भात भाजपातील प्रमुख नेत्यांनीही बोलण्यासाठी नकार दिलाय.

खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

गेल्या सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणारे खडसे त्यांचं पहिल्या यादीत नाव नसल्याने कमालीचे निराश झाले आहेत. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पुढच्या यादीत नाव येईल असा आशावाद व्यक्त केला होता.

खडसेंकडून सूचक संकेत

पक्षाने माझ्याऐवजी रोहिणी यांना उमेदवारी देण्याबाबत काही दिवसांपूर्वी मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे पक्ष देईल तो आदेश मान्य असेल, असं खडसे म्हणाले. रोहिणी यांना उमेदवारी देण्यात यावी, असं पक्षाचं मत आहे. त्यामुळे यादीत नाव आल्याशिवाय पुढचं काहीही बोलणं योग्य ठरणार नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलंय.

भाजपची तिसरी यादी

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या दोन यादीत होल्डवर ठेवलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा या यादीतही समावेश नाही. शिरपूर, साकोली, मालाड पश्चिम आणि रामटेकच्या उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलंय. भाजपने यापूर्वी दोन याद्यांमध्ये 139 उमेदवार जाहीर केले होते, तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण 143 उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झाली आहेत.

भाजपच्या 143 उमेदवारांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *