'बविआ'च्या दोन टर्म आमदाराची शिवसेनेत घरवापसी, हितेंद्र ठाकूर म्हणतात...

बविआचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी 'देव त्यांचं भलं करो' अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे

'बविआ'च्या दोन टर्म आमदाराची शिवसेनेत घरवापसी, हितेंद्र ठाकूर म्हणतात...

विरार : बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे (Vilas Tare) पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत परतले आहेत. त्यानंतर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी ‘देव त्यांचं भलं करो’ अशी प्रतिक्रिया देत मौन पाळलं.

विलास तरे हे पालघर जिल्ह्यातील बोईसर (Boisar) विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार होते. तरेंसह बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेची वाट धरली. तरेंच्या पक्षांतरामुळे ‘बविआ’ला मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे.

बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना विलास तरेंच्या पक्षांतराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘देव त्यांचं भलं करो’ अशी सूचक प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. पक्षांतराचं कारण काय? असं विचारलं असता, ‘ते त्यांनाच माहित. देव त्यांचं भलं करो’ असं पुन्हा एकदा म्हणत ठाकूर निघून गेले.

पालघरमध्ये बविआचं वर्चस्व

पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. विलास तरेंबाबत गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तिकीट न मिळण्याच्या शक्यतेनेच तरेंनी घरवापसी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी विलास तरे यांच्या हातावर शिवबंधन बांधलं आणि भगवा झेंडा हाती दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

आम्ही कोणाला फोडत नाही

‘शिवसेनेत येणाऱ्यांसाठी आम्ही काही टार्गेट ठरवलेलं नाही. विलास आमचे जुने शिवसैनिक. मध्यंतरी दुसरीकडे गेले होते. मात्र शिवसेनेची वाटचाल पाहून ते पुन्हा स्वगृही येत आहेत. आम्ही कोणाला फोडायला जात नाही. आमच्याकडे वॉशिंग पावडरही नाही. अजून कोण कोण येणार हे लवकरच कळेल’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहेत. मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार आहोत. चांगलं काम करण्यासाठी सहकारी मिळत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे.” असंही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

एकीकडे, शिवसेनेचे पालघरमधील दिवंगत माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचं राजकीय भवितव्य काय असणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या कोट्यात असलेल्या पालघरच्या जागेचं तिकीट सेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या गावितांना देण्यात आलं आणि ते पुन्हा निवडूनही आले. मात्र श्रीनिवास वनगा यांना खासदारकीचं तिकीट देण्याबाबत मिळालेलं आश्वासन गुंडाळण्यात आलं. आता विधानसभेला त्यांना उमेदवारी मिळणार का, असा सवाल विचारला जात आहे.

राष्ट्रवादीला टोला

‘भगवा नुसता हातात धरुन उपयोग नाही, तो हृदयात असावा लागतो’ असा टोला उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये यापुढे भगव्या झेंड्यासह दोन झेंडे फडकणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *