एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदारालाच दम

दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमचं ठरलंयची परतफेड म्हणून काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेना खासदारालाच दम

कोल्हापूर : आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा, भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Sanjay Mandlik) यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते (Chandrakant Patil Sanjay Mandlik) बोलत होते. या मतदारसंघात भाजपकडून अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुराज पाटील (Amal Mahadik Vs Ruturaj Patil) यांच्यात लढत होत आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमचं ठरलंयची परतफेड म्हणून काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

आम्हाला गद्दारी जमत नाही म्हणूच रोष पत्करुन आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी खासदार मंडलिकांच्या निमित्तानं शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न केला.

 युतीच्या जागा

युतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना 8 तर भाजप 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जंग जंग पछाडले. मात्र शिवसेनेनं आपल्या ताब्यातील एकही जागा सोडली नाही. त्यामुळे याचा राग भाजपला आहेच. त्यातच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेस उमेदवार आणि आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

लोकसभेला आमचं ठरलंय या भूमिकेची परतफेड म्हणून आपण काँग्रेसला मदत करणार असल्याचं संजय मंडलिक यांनी सांगितलं आहे. आधीच अपेक्षित जागा न मिळल्यानं नाराज असलेल्या भाजपचा,  खासदार मंडलिक यांच्या भूमिकेमुळे तीळपापड झाला आहे. हाच राग खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्केट यार्ड येथील गणेश हॉल इथं झालेल्या बूथ प्रमुख मेळाव्यात जाहीरपणे बोलून दाखवलाय.

आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा असा दम खासदार मंडलिक यांना देतानाच, युतीधर्म पाळला नाही तर सहकार्याची अपेक्षा करू नका, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला.

जिल्ह्यात ताकद वाढलेली असताना केवळ दोनच जागांवर समाधान मानावं लागल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील अस्वस्थ आहेत. त्यातच खासदार मंडलिक यांच्या भूमिकेमूळे पक्षाची एक जागा अडचणीत आल्यानं, त्यांनी आम्ही साधे दिसतो पण डोक्यात खूप काही चाललं असतं असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

पालकमंत्री पाटील यांनी दिलेला दम पाहता खासदार संजय मंडलिक हा इशारा कितपत गांभीर्यानं घेतात हे पाहावं लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी काय झालं होतं?

लोकसभा निवडणुकीला शिवसेनेकडून संजय मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक अशी लढत झाली. त्यावेळी भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे  आमदार आणि धनंजय महाडिक यांचे चुलतबंधू अमल महाडिक यांनी युतीधर्म न पाळता, राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचा मंडलिक यांचा आरोप आहे. त्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही आघाडी धर्म न पाळता शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून संजय मंडलिक हे काँग्रेसच्या मंचावर दिसले होते. त्यांनी विधानसभेला कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात सतेज पाटील यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे जो दम चंद्रकांत पाटील शिवसेना खासदाराला देत आहेत, तोच दम त्यांनी भाजपच्या आमदाराला लोकसभा निवडणुकीवेळी का दिला नाही, असा प्रश्न संजय मंडलिक समर्थकांकडून विचारला जात आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI