‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचं उल्लंघन करु नका’, चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

गेल्या काही दिवसांत राज्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्याचा धडाका राज्य सरकारनं लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे आवाहन केलं आहे

'सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचं उल्लंघन करु नका', चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाढीव बदल्यांना दिलेली परवानगी मागे घेऊन कायद्याचे उल्लंघन टाळावं. तसंच राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती, तिसऱ्या लाटेचा धोका आणि पुराचे संकट ध्यानात घेऊन सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात, असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी एका पत्राद्वारे केलं आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्याचा धडाका राज्य सरकारनं लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे आवाहन केलं आहे. (Chandrakant Patil’s letter to CM Uddhav Thackeray on officials and staff transfers)

चंद्रकांतदादा पाटील पत्रात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीची मर्यादा वाढवून 25 टक्के केली आहे. त्यासोबत विशेष कारणास्तव 10 टक्के बदल्यांना परवानगी दिली आहे. अशा रितीने एकूण संख्येच्या 35 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास परवानगी दिली गेली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे 2005 साली राज्यात बदलीचा कायदा झाला आणि एकूण संख्येच्या तीस टक्केपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास कायद्याने प्रतिबंध झाला आहे. तथापि, एकूण 35 टक्के बदल्यांना परवानगी दिल्याने कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दिसून येत आहे.

‘..तर बेकायदेशीर बाबींची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील’

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बाजार मांडल्याच्या तक्रारी उघडपणे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बदल्यांचा कोटा वाढविल्यामुळे अधिक बाजार करण्यास संधी मिळत आहे. आघाडीतील मित्रपक्षांच्या दबावाखाली किंवा अन्य कोणाच्या दबावाने मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या बाजाराला मोकळीक दिली तरी मूळ आदेश त्यांच्या मंजुरीने निघाला असल्याने बेकायदेशीर बाबींची जबाबदारी त्यांचीच राहील, असा इशाराही पाटील यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना दिलाय.

‘कोरोना, महापुराच्या पार्श्वभूमीवर बदल्या टाळाव्या’

राज्यातील कोरोना स्थिती अजूनही गंभीर असल्याची राज्य सरकारची धारणा आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यास कोरोनाविरोधी कामावर प्रतिकूल परिणाम होईल. तसंच राज्यातील पूरग्रस्त भागात लोकांना मदतीची तातडीने गरज असताना सरकारी यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल केले तर संकटग्रस्तांसाठी आणखी नुकसानकारक ठरेल. कोरोनाच्या स्थितीत बदल्या करू नयेत, असे सरकारचे मूळ धोरण गेल्या वर्षी होते आणि त्यानुसार सध्याच्या परिस्थितीत बदल्या टाळाव्यात, असंही पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री या पत्राची दखल घेणार का हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा; फडणवीसांचं अशोक चव्हानांना आव्हान

MPSC ला जागा देण्यास 2 वर्षे, पुरावेळी फडणवीसांची महाजनादेश यात्रा, फेसबुक पोस्टमधून रोहित पवारांनी भाजपचा इतिहास काढला

Chandrakant Patil’s letter to CM Uddhav Thackeray on officials and staff transfers

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI