पुढच्या निवडणुका एकत्र लढवून सरकार रिपीट होणार, भुजबळांना विश्वास

भाजपमध्येही कुरबुरी चालूच असतात ना? तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या कुरबुरी चालणारच, असं भुजबळ म्हणाले

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 12:37 PM, 27 Nov 2020
Governor elected vidhan parishad mlc

पुणे : ठाकरे सरकार लवकरच पडणार असे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एकच फाईट दिली. “हे सरकार पाच वर्षे चालेल, आणि पुढच्या निवडणुका एकत्र लढवून पुन्हा हे सरकार रिपीट होणार” असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. (Chhagan Bhujbal says Maha Vikas Aghadi Government will repeat)

“एका पक्षाचे सरकार असलं तरी कुरबुर होतेच, हे तर तीन पक्षाचे सरकार आहे. भाजपमध्येही कुरबुरी चालूच असतात ना? तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या कुरबुरी चालणारच. कोरोनामुळे कोणी कोणाला भेटत नाही, आम्ही व्हीसीद्वारे भेटत असतो” असं भुजबळ म्हणाले.

“विरोधक आपले कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, म्हणून लॉलिपॉप देतात, मात्र हे सरकार 100 टक्के पाच वर्ष पूर्ण करणार. त्यानंतर सर्व निवडणुका एकत्र लढू, हे सरकार परत रिपीट होईल. लहान लहान गोष्टींमुळे सरकार पडणार नाही, सरकार कोरोनानंतरही चांगले काम करेल” असा विश्वास छगन भुजबळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

“आडवे करण्याची शिवसेनेची भाषा आधीपासूनच”

“आडवे येणाऱ्यांना आडवे करु, अशी शिवसेनेची भाषा पहिल्यापासून आहे. राजकारणात प्रत्यक्षात कोण कोणाला आडवं करत नाही, हा सांकेतिक शब्द आहे” असंही भुजबळ म्हणाले.

“जीएसटीच्या 30 हजार कोटींचा परतावा अजून मिळालेला नाही. राज्याची स्वतंत्र टॅक्स वसूल यंत्रणा होती, ती बंद करुन जीएसटी सुरु केली. आम्हाला मिळणारा टॅक्स त्यांनी गोळा केला, मात्र आम्हाला परत काही देत नाहीत. भाजपच्या नेत्यांनी केंद्राकडे जाऊन सांगायला हवं होतं. राज्याचं अर्थचक्र थांबलं होतं, अशा वेळी केंद्राने मदत करायला हवी होती. राज्याचे हक्काचे पैसे आहेत” असं भुजबळ म्हणाले.

“अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात इतके महिने झाले काहीच घडले नाही, मुंबई पोलीस चांगला तपास करत होते, आत्ता 10 ग्रॅम ड्रग्ज सापडले, विरोधी पक्षाचे सरकार जिथे जिथे आहे, तिथे केंद्रीय संस्थांचा वापर करुन सत्तेसाठी प्रयत्न होत आहे. त्यात त्यांना यश येणार नाही, मात्र ते प्रयत्न करतच राहणार” अशी टीकाही भुजबळांनी केली.

“कोरोना काळात सरकारने उत्तम काम केले. धारावी आणि मुंबईसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल युनो आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनीही घेतली. आम्ही जनतेपर्यंत धान्य पोहोचते केले. 9 लाख टन धान्य राज्य सरकारने जनतेपर्यंत दर महिन्याला दिले. शिवभोजन थाळी पाच रुपयात कोरोना काळात दिली, त्याचा गरजवंतांना उपयोग झाला. अडचणीत सरकारने चांगले काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचं आम्ही स्वागतच करतो” असंही भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal says Maha Vikas Aghadi Government will repeat)

“ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजाची मागणीदेखिल तशीच आहे, मात्र सराटे यांची ओबीसी संदर्भातील जी मागणी आहे, तिला आमचा विरोध आहे” असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

मी बोललो तर मला त्रास दिला, पवारसाहेबांना नोटीस दिली, विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी संस्थांचा वापर : छगन भुजबळ

मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु: छगन भुजबळ

(Chhagan Bhujbal says Maha Vikas Aghadi Government will repeat)