आरसा पाठवतोय, तोंड बघून घ्या; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींना आरसा भेट

आरसा पाठवतोय, तोंड बघून घ्या; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींना आरसा भेट


नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि छत्तीसडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरसा भेट पाठवला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करत आरसा पाठवल्याची माहिती दिली आहे. तसेच मोदींना खोचक सल्लाही दिला आहे.

मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आपल्या ट्विटमध्ये आरसा ऑर्डर केल्याची रिसीट जोडली आहे. तसेच मोदींनी स्वतःसाठी वारंवार वापरलेल्या वेगवेगळ्या विशेषणांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, “मी तुम्हाला भेट म्हणून आरसा पाठवत आहे. हा आरसा तुम्ही तुमच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी अशा ठिकाणी लावा, जेथून तुम्ही सर्वाधिक वेळा ये-जा करता. म्हणजे तुम्हाला वारंवार आरशात स्वतःचा चेहरा पाहून तुमचा खरा चेहरा कोणता आहे हे ओळखता येईल.” मोदींना भाषणांमध्ये आपला उल्लेख चायवाला, फकीर, प्रधान सेवक, चौकीदार अशा विशेषणांनी केला आहे.

बघेल यांनी यानंतर आणखी एक ट्विट केले. “कदाचित तुम्ही मी पाठवलेल्या आरशाचा उपयोगही करणार नाही. तो आरसा पंतप्रधान निवासातील एखाद्या कचराकुंडीतही फेकून द्याल. मात्र, तरीही तुम्ही आरसा पाहण्यापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. या निवडणुकीत 125 कोटी जनता तुम्हाला आरसा दाखवेल,” असा सल्ला या ट्विटमधून बघेल यांनी मोदींना दिला आहे. त्यांनी मोदींना पत्रही लिहिले असून त्याची फेसबूक लिंकही या ट्विटमध्ये नमूद केली. या पत्रात बघेल यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.

व्हिडीओ पाहा:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI