सेना-भाजप फेव्हिकॉलचा जोड, युतीमुळे काहींची माघार : मुख्यमंत्री

सेना-भाजप फेव्हिकॉलचा जोड, युतीमुळे काहींची माघार : मुख्यमंत्री

अमरावती : आम्ही (शिवसेना-भाजप) हिंदुत्त्ववादी आहोत. या देशाच्या राष्ट्रीयत्त्वासाठी आम्ही युती केली आहे. ही युती विचारांची आहे, केवळ सत्तेसाठी नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, शिवसेना-भाजप ही युती फेव्हिकॉलच्या मजूबत जोडप्रमाणे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. युतीमुळे काही जणांनी माघार घेतली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना टोलाही लगावला.

अमरावतीत शिवसेना आणि भाजप युतीच्या पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले होते. अमरावतीतून सेना-भाजप युतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

“आता एकच गोष्ट आपला उमेदवार म्हणजे युती. भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेना काम करेल आण शिवसेनेचा असेल तिथे भाजप काम करेल. युती हा आपला एकच धर्म, जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचं नाही”, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलं.

“गरिबी हटावचे नारे अनेक वर्षांपासून काँग्रेसने दिला. मात्र गरिबी हटली नाही. त्यांचे चलेचपटे मात्र मोठे झाले. आम्ही गरिबांसाठी घरापासून अनेक योजना आणल्या. त्याचा फायदा होत आहे. गरिबांच्या स्वप्नांना या योजनेच्या माध्यमातून फायदा मिळत आहे.”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

अजित पवारांवरही निशाणा

“अजित पवार म्हणतात, पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत होते, पण दादा माझी नर्सरी झाली, शाळा झाली, कॉलेज होऊन मी मुख्याध्यापकही झालो, पण तुम्ही कुठे आहात?” असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लगावला.

Published On - 1:57 pm, Fri, 15 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI