लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सज्ज, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार

लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सज्ज, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हालचाली वेगवान केल्या आहेत. शरद पवार आणि राहुल गांधी यांनी आज दिल्लीत राज्यातील जागावाटपावर चर्चा केली. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.

लोकसभेच्या राज्यातील 48 पैकी 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तर 25 जागा काँग्रेस लढेल, असा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात काँग्रेस लढेल, हे मात्र निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादी लढण्याची शक्यता असलेल्या 23 जागा नेमक्या कुठल्या आणि काँग्रेस लढण्याची शक्यात असलेल्या 25 जागा नेमक्या कुठल्या, याची स्पष्टता अद्याप दोन्ही पक्षांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे त्याबाबत अद्याप संभ्रम आहे.

पुणे, औरंगाबाद , रावेर, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि अहमदनगर या सहा जागांचा तिढा कायम आहे.

या सहा जागांवरुन तिढा कायम

अहमदनगरसाठी काँग्रेस इच्छुक

1) अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिथे विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.

सिंधुदुर्ग कुणाकडे?

2) सिंधुदुर्गची जागा ही राष्ट्रवादीनं मागितली आहे. काँग्रेसकडे त्यासाठी तुल्यबल उमेदवार नसल्याचं कारण दिलं जात आहे. पण राणे कुटुंबीयांसाठी तर ही जागा राष्ट्रवादी मागत नाही ना अशी चर्चा आहे.

नंदुरबारसाठी दोघांचा हट्ट

3) नंदुरबारमधली जागा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. तिथून काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची कन्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादी मात्र एका भाजपच्या विद्यमान खासदारासाठी या जागेवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे.

पुण्यातील जागेवरुन तिढा कायम

4) पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या काँग्रेसकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेसचे विश्वजीत कदम या जागेवरुन लढले होते. त्यामुळे ही जागा कुणाला मिळते, याबाबतही सर्वांना उत्सुकता आहे.

औरंगाबादचा तिढा कसा सुटणार?

5) औरंगाबादच्या जागेचा तिढाही असाच आहे. औरंगाबादची जागा काँग्रेसकडे असली तरी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस सतीश चव्हाण यांच्यासाठी इच्छुक आहे.

रावेरची जागा कुणाला?

6) तर रावेरच्या जागेवर स्थानिक नेत्यांनी काँग्रेसनं ही जागा लढावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. रावेरमध्ये माजी खासदार उल्हास पाटील या जागेसाठी आग्रही आहे. तर गेल्यावेळी मनिष जैन यांनी काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जात निवडणूक लढवली होती.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI