काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांचे पुत्र समीर द्विवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये!

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांचे पुत्र समीर द्विवेदी यांनी भाजपचा झेंडा हाती (Congress leader son joins BJP) धरला आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत समीर द्विवेदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

समीर द्विवेदींचे पिता जनार्दन द्विवेदी हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. दशकभरापासून त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांची जाहीरपणे स्तुती केल्यामुळे जनार्दन द्विवेदी चर्चेत आले होते. 2015 मध्ये एका मुलाखतीत द्विवेदींनी मोदींमुळे नव्या युगाची सुरुवात झाल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावाही केला होता.

“मी प्रथमच एखाद्या राजकीय पक्षात सामील होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे मी प्रेरित झालो आणि भाजपची निवड केली” असं राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समीर द्विवेदी यांनी सांगितलं.

‘मला याबद्दल काहीही माहिती नाही, जर तो भाजपमध्ये प्रवेश करत असेल, तर हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया जनार्दन द्विवेदी यांनी ‘एएनआय’ला दिली आहे.


दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यावरुन देशात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवरही समीर द्विवेदींनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. ‘वणवा सर्वत्र पसरण्यापूर्वी लोकांनी एकत्र यावं, असं आवाहन द्विवेदींनी केलं.

शाहीन बागमध्ये सीएएविरोधी झालेल्या आंदोलनाविषयी बोलताना समीर द्विवेदींनी चळवळीच्या नावाखाली डाव्या पक्षांनी हिंसाचार पसरवल्याचा आरोप केला.

“शाहीन बागमध्ये आंदोलन करणार्‍या महिलांना मला विचारायचं आहे, तिहेरी तलक रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? पंतप्रधान मोदींनी जर हा निर्णय घेतला, तर ते तुमचं नागरिकत्व काढून घेतील, यावर तुम्ही कसा विश्वास ठेवता?” असा प्रतिप्रश्न समीर द्विवेदींनी (Congress leader son joins BJP) उपस्थित केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI