अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग मिळण्याची शक्यता, काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप

कृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण विभागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग मिळण्याची शक्यता, काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले, तरी खातेवाटपाचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही. मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप वेळेत झालं, मात्र खातेवाटपाचा घोळ अद्यापही कायम आहे. काँग्रेसमुळे खातेवाटप रखडल्याचं बोललं जात असलं, तरी काँग्रेसची खातेवाटपाची यादी (Congress Ministry Alloacation) तयार असल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप

बाळासाहेब थोरात – महसूल, मदत आणि पुनर्वसन
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वडेट्टीवार – बंदरे, मत्स्य व्यवसाय, ओबीसी
के. सी. पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला आणि बाल कल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण
सुनील केदार – दुग्ध विकास आणि पशु संवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्याकडे कोणत्या विभागाची धुरा सोपवली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम या राज्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या दोन मंत्र्यांना कोणती जबाबदारी मिळणार, हेही अद्याप निश्चित नाही.

खातेवाटप जाहीर करण्यास नेमका कधीची मुहूर्त लागणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काँग्रेसमुळे हे खातेवाटप रखडल्याची चर्चा आहे. कृषी आणि ग्रामविकास या ग्रामीण विभागाशी संबंधित खात्यांसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सहकार खात्यावरही काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मात्र शिवसेनेचा कृषी खातं सोडण्यास नकार असल्यामुळे तणातणीची चिन्हं आहेत.

दुसरीकडे, बंदरे, खारभूमी, सांस्कृतिक खाती देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र कमी महत्त्वाची खाती घेण्यास काँग्रेसचा नकार आहे. त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचं म्हटलं जातं. आता खातेवाटपावर शरद पवार काय निर्णय घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं (Congress Ministry Alloacation) आहे.

राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?

अनिल देशमुख- गृह
अजित पवार– अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील– जलसंपदा
दिलीप वळसे पाटील– कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड– गृहनिर्माण
नवाब मलिक– अल्पसंख्याक
हसन मुश्रीफ– सहकार
धनंजय मुंडे– सामाजिक न्याय

शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाची यादी

एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई– उद्योग आणि खनिकर्म
अनिल परब– सीएमओ
आदित्य ठाकरे– पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
उदय सामंत– परिवहन

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस मंत्री अशोक चव्हाण यांच्यामध्ये बैठकीतच खडाजंगी झाल्याचं वृत्त काल आलं होतं. अजित पवारांनी या चर्चांचं खंडण केलं असलं, तरी खातेवाटपाचा घोळ पाहता तिन्ही पक्षांमध्ये खेचाखेची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

निर्णायक बैठकीत शिवसेनेने आपल्या पारड्यात तब्बल 24 खाती पाडून घेतली. तर गृह खातं राष्ट्रवादीला सोडल्याने सेनेकडे आता 23 खाती आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. या सर्व मंत्र्यांना कोणते खातं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

खातेवाटपाचा घोळ कायम असल्याने पालकमंत्रिपदांची वाटणीही रखडली आहे. तूर्तास 13-13-10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. Congress Ministry Alloacation

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *