बिगारी कामगार ते विधानसभेचे उपाध्यक्ष; जाणून घ्या नरहरी झिरवाळांबद्दल!

साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. (know about maharashtra assembly deputy speaker narhari zirwal)

बिगारी कामगार ते विधानसभेचे उपाध्यक्ष; जाणून घ्या नरहरी झिरवाळांबद्दल!
narhari zirwal

मुंबई: साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधीत्व करणारे झिरवाळ अथक संघर्षातून पुढे आले आहेत. झिरवाळ नेमके कोण आहेत? कसं आहे त्यांचं राजकारण? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (know about maharashtra assembly deputy speaker narhari zirwal)

कोण आहेत नरहरी झिरवाळ?

नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे.

बिगारी कामगार म्हणून काम

झिरवाळ यांचे शिक्षण कला शाखेपर्यंत झालं आहे. परंतु झिरवाळ यांची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात बिगारी काम करावं लागलं होतं. त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणून ते कामाला लागले. परंतु, कामात मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी गावात शेतीची कामं सुरू केली.

जनता दलातून सुरुवात

जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंचही झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2001 साली ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयी झाले.

सलग तिसऱ्यांदा आमदार

विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत झिरवाळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरुन काढला. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह झिरवाळ यांनी सलग दोनवेळा दिंडोरी मतदार संघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळवला.

विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचं जागावाटपात ठरलं होतं. तर उपाध्यक्षपद झिरवाळ यांच्याकडे सोपवलं आहे. आता पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. झिरवाळ यांच्या रूपाने दुसर्‍यांदा नाशिक जिल्ह्याला विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी सुरगाण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांना 2014 मध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. शिवाय विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पोहोचणारे ते नाशिकमधील पहिलेच नेते आहेत.

शेती काम सुरू

झिरवाळ यांची राहणीमान अत्यंत साधी आहे. आजही ते साध्या घरात राहतात. विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तरी आजही ते शेती काम करतात. जलंधारण, कुपोषण मुक्ती, जंगलतोड बंदी, आदिवासींचे प्रश्न आणि गुजरात पाणी प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. (know about maharashtra assembly deputy speaker narhari zirwal)

संबंधित बातम्या:

कट्टर काँग्रेसी, थेट उद्वव ठाकरेंना उपोषणाचा इशारा; वाचा, कोण आहेत कैलास गोरंट्याल?

काँग्रेसच्या गडात कमळ फुलवले; वाचा कोण आहेत काशीराम पावरा?

विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी, चारवेळा आमदार; वाचा, कोण आहेत जयकुमार रावल?

(know about maharashtra assembly deputy speaker narhari zirwal)

Published On - 4:16 pm, Sat, 1 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI