चंद्रकांत पाटलांची तब्येत बरी आहे ना? शिवसेनेचा उपरोधिक सवाल

राज्यापालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो आणि राजभवन नाहक बदनाम होते. (Shivsena Criticism On BJP Chandrakant Patil) 

चंद्रकांत पाटलांची तब्येत बरी आहे ना? शिवसेनेचा उपरोधिक सवाल

मुंबई : “भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांत दादांना का वाटते, ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वैगरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वैगरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाईन मॉर्निंगला बोलवणं येईल म्हणून ते झोपतच नाहीत,” असा उपरोधिक सवाल शिवसेनेनं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला. (Shivsena Criticism On BJP Chandrakant Patil)

“पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांत दादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात पहाट योग एकदाच आला आणि तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडमोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यापालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो आणि राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते आणि पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

“चंद्रकांत दादांना नीट झोप वैगरे लागते ना?”

“राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तवल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाईन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांत दादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वैगरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वैगरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाईन मॉर्निंगला बोलवणं येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत,” अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

“चंद्रकांत दादांना फाईन मॉर्निंगला काहीतरी घडेल, असे वाटते, हे काही चांगल्या प्रकृतीचे साइन नाही. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला, त्यामुळे एखाद्या फाईन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल, असे कोणाला वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत.” (Shivsena Criticism On BJP Chandrakant Patil)

“एकतर अशा फाईन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपनं याआधी केलाच आहे, पण त्या फाईन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्र बाबूंनाच आहे. भाजपला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही. हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्याच वेळी एखाद्या फाईन मॉर्निंगला काहीतरी घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे?” असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

“चंद्रकांत दादा पहाटे दचकून जागे होतात” 

“महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही. पण चंद्रकांत दादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे, असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे.”

मध्यावधी निवडणुकांची भाकितं करुन त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल, तर ‘घडाळ्या’चे काटे गतिमान आहेत. यावेळी वेळा चुकणार नाही याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे. घड्याळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित पवारांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे. ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच जागते रहोच्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न? असेही शिवसेनेनं म्हटलं आहे. (Shivsena Criticism On BJP Chandrakant Patil)

संबंधित बातम्या : 

“चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?” संजय राऊतांचा टोला

Exclusive | एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *