गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री माफी मागणार?; कोर्टाच्या निर्णयावरून फडणवीसांचा सवाल

कंगना रणौत प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. (devendra fadnavis slams thackeray government over court decision)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:27 PM, 28 Nov 2020

मुंबई: पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात कोर्टाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. (devendra fadnavis slams thackeray government over court decision)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. यावेळी गोस्वामी आणि रणौत प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालातील उतारेच्या उतारेच फडणवीस यांनी वाचून दाखवले. ठाकरे सरकारच्या एका वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका म्हणजे काल आलेले कोर्टाचे हे दोन निर्णय आहेत. या दोन्ही प्रकरणात सरकार सूडबुद्धीने कसे वागले हे त्यातून अधोरेखित झाले आहे. सरकारने दोन्ही प्रकरणात सरकारी तंत्राचा गैरवापर केल्याचं या दोन्ही निर्णयातून स्पष्ट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकार विरोधात बोलाल तर तुरुंगात टाकू ही दमनकारी नीती सरकारने वापरल्याचंही या निकालातून स्पष्ट होत असल्याचं सांगतानाच हे दोन्ही निकाल आले आहेत. आता मुख्यमंत्री कुणावर कारवाई करणार? या गोष्टीला कुणाला जबाबदार धरणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार? अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

सरकारमध्ये असलेल्या लोकांवर टीका होतच असते. माझ्या पत्नीवरही बरीच टीका झाली. शिवसेनेचे अधिकृत नेते म्हणवून घेणाऱ्यांनीही टीका केली. ट्विटरवर हे लोक काय बोलले हे सर्वांना माहीत आहे. पण मी कधी कांगावा केला नाही. आम्ही कधीही कुणाच्या घरावर हल्ला केला नाही. मात्र, तुम्हालाही मुलंबाळं आहेत, असं सांगून धमकावणारे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधानांकडे खुशाल तक्रार करा

मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे वागावे. ते तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातूनही दिसलं पाहिजे, असं सांगतानाच पंतप्रधानांकडे तक्रारी केल्या तरी आम्ही रस्त्यावर उतरणारच. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. आम्ही आमचं काम करू. तुमच्या नाकर्तेपणामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.

चिरडण्याची भाषा करणारे टिकले नाहीत

मुख्यमंत्री शांत आणि संयमी आहेत. हे ऐकून होतो. पण असा धमकावणारा मुख्यमंत्री मी महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिला नाही. हात धुवून मागे लागू, तुमची खिचडी शिजवू, ही कोणती भाषा आहे? मुख्यमंत्र्यांनी वर्षपूर्ती निमित्त दिलेल्या भाषणात राज्याचं व्हिजन दिसेल असं वाटलं होतं. पण त्यात तर नुसत्या धमक्या होत्या. चिरडण्याची भाषा होता. तुम्ही संविधानिक पदावर आहात. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असं सांगतानाच हे काय नाक्यावरचे भांडण आहे का? असा सवाल त्यांनी केला. अशा प्रकारची चिरडण्याची भाषा करणारे फार काळ टिकले नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण आमची तशी मागणी नाही : देवेंद्र फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

(devendra fadnavis slams thackeray government over court decision)