मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:52 AM, 28 Nov 2020
मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

मुंबई :  महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात कधीच पाहिला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray over Interview with Saamana)

“पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या प्रकरणाचे निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आली हे बरं झालं. नाहीतर ही मुलाखत म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरला असता”, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने भाजपने राज्य सरकारची पोलखोल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

फडणवीस म्हणाले की, “दलित, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत माहिती मिळेल, असं वाटत होतं, परंतु मुख्यमंत्र्यांनी केवळ टीका टिप्पणी केली. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत”.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आहेत असं मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो. पण त्यांचं दसरा मेळाव्यातील भाषण असो अथवा काल झालेली मुलाखत, यातून ते संयमी नसल्याचे दिसून आले. ते सध्या एका संविधानिक पदावर आहेत. परंतु त्यांच्या मुलाखतीत राज्याच्या विकासावर कोणतीही चर्चा नाही, कुणाच्या मागे हात धुवून लागू यावर मुलाखतीचा भर होता”.

“मुख्यमंत्री काल जे काही बोलले ते बघून असं वाटतं की, अशा प्रकारचे भांडण नाक्यावर होतं, सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने होत नाही. चिरडण्याची भाषा आजवर ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत”.

स्थगिती देणारं सरकार

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, “आरेमधील मेट्रो प्रकल्पाबाबतचं खरं सत्य आम्ही एका पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणार होतो. ठाकरे सरकारने मुंबईकरांना मेट्रोपासून कसं दूर ठेवलं, हे सांगणार आहोत. हे सरकार प्रत्येक कामावर स्थगिती देत सुटलं आहे. आतापर्यंत या सरकारने कोणकोणत्या कामांवर स्थगिती दिली याची यादी माझ्याकडे आहे. तीसुद्धा जनतेसमोर माडली जाईल”.

ठाकरे सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे. देशातील अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात लाट आलेली नाही हे आपलं सुदैव आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेली म्हणाले.

संबंधित बातम्या

चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत : देवेंद्र फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

(It is good that Uddhav thaceray’s interview came a day before high court results on Kangana Ranaut and Arnab Goswami issue : Devendra Fadnavis)