मोदींच्या त्सुनामीत दिग्विजय-शत्रुघ्न-कन्हैयासह ‘या’ दिग्गजांचा सुपडासाफ

  • Updated On - 6:47 pm, Thu, 23 May 19
मोदींच्या त्सुनामीत दिग्विजय-शत्रुघ्न-कन्हैयासह 'या' दिग्गजांचा सुपडासाफ

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज लागत आहेत. त्यासाठी मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांच्या कलनुसार मोदी लाटेत अनेक दिग्गज वाहून गेल्याचं चित्र आहे. यंदाही मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपने आतापर्यंत 300 जागांचा आकडा पार केलेला आहे. मोदींच्या त्सुनामीत काँग्रेससह देशातील इतर पक्षांच्या बड्या नेत्यांचा सुपडासाफ झालेला आहे. काँग्रेसचे अनेक बडे नेते पराभूत झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. हे अंतिम आकडे नसले तरीही विरोधकांचा विजय आता अशक्य वाटतो आहे. बघुयात काही बड्या नेत्यांची स्थिती-

मल्लिकार्जुन खर्गे (काँग्रेस)

कर्नाटकच्या गुलबर्गा या मतदार संघातून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे रिंगणात होते. आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार मल्लिकार्जुन खर्गे हे पिछाडीवर आहेत. भाजपच्या उमेश जी जाधव हे मल्लिकार्जुन खर्गेपेक्षा 42 हजार मतांच्या आघाडीवर आहेत.

शत्रुघ्न सिन्हा (काँग्रेस)

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारच्या पटनासाहिब या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपचे रवि शंकर प्रसाद निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्याच्या आकडेवारीनुसार, शत्रुघ्न सिन्हा हे 74 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

कन्हैया कुमार (सीपीआई)

बिहारच्या बेगूसराय या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले सीपीआय उमेदवार कन्हैया कुमारचाही सुपडासाफ झाला आहे. भाजप उमेदवार गिरीराज सिंह हे कन्हैया कुमारच्या विरोधात रिंगणात होते. सध्या कन्हैया कुमार हा 77 हजार मतांनी पिछाडीवर आहे.

ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेस)

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशच्या गुना या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने केपी यादव यांना तिकीट दिलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे हे देखील सध्या 53 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

दिग्विजय सिंह (काँग्रेस)

भोपाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहांना देखील मोदी लाटेचा फटका बसलेला आहे. दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा ठाकूर अशी लढत भोपाळ मतदार संघात बघायला मिळाली. भोपाळच्या राजकारणात अनेक नाटकीय घडामोडी घडल्या. साध्वी प्रज्ञा यांना प्रचार बंदीही करण्यात आली. मात्र, तरीही साध्वी प्रज्ञाने दिग्विजय सिंहांना तगडी लढत दिली. सध्या दिग्विजय सिंह हे तब्बल 1 लाख 10 हजार 520 मतांनी पिछाडीवर आहेत.