आम्हाला शिवसेनेने दिलेला त्रास विसरणार नाही, आदित्यबाबत मनसेची भूमिका, नांदगावकर ट्रोल

आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरुन बाळा नांदगावकर सोशल मीडियावर ट्रोल झाल्याचं पाहायला मिळत आहे (Bala Nandgaonkar on Aaditya Thackeray Sushant Case)

आम्हाला शिवसेनेने दिलेला त्रास विसरणार नाही, आदित्यबाबत मनसेची भूमिका, नांदगावकर ट्रोल
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 14, 2020 | 11:44 AM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पाठराखण केली. मात्र, यानंतर मनसेमधूनच यावर असहमतीचा सूर ऐकायला मिळतोय. आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरुन बाळा नांदगावकर यांना महाराष्ट्र सैनिकांनीच सोशल मीडियावर ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे (Bala Nandgaonkar on Aaditya Thackeray Sushant Case).

मनसे नेते संतोष धुरी यांनीही बाळा नांदगावकर यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबतचे मत हे बाळा नांदगावकर यांचे वैयक्तिक मत असावे. आम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसेनेने दिलेला त्रास आणि दररोजचा आमचा त्यांच्याशी होणार संघर्ष विसरणार नाही, असं मत धुरी यांनी व्यक्त केलं. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणावर काय अंतिम भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मनसेचे नेते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. “ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असं वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावर यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आदित्य ठाकरे यांना मनसेचं समर्थन असल्याचं उघड झालं आहे.

आदित्य ठाकरेंकडूनही उत्तर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवरुन आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच उत्तर दिलं आहे. “सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन गलिच्छ राजकारण केलं जात आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे”, अशी प्रतक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिली होती.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

“सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला होता.

“मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

“कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

“सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

“मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईस या भ्रमात कोणी राहू नये”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर पूर्ण विश्वास, मनसेचा आदित्य ठाकरेंना भक्कम पाठिंबा

सुशांतच्या मृत्यूवरुन टाहो, स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत ब्रही नाही, विनायक राऊतांचा राणेंवर गंभीर आरोप

… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत

Bala Nandgaonkar on Aaditya Thackeray Sushant Case

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें