विदर्भात काँग्रेसला खिंडार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हातात शिवबंधन बांधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश केला.

विदर्भात काँग्रेसला खिंडार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु झालं आहे. नुकतंच काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी हातात शिवबंधन बांधत आज (23 जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री असलेले सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. मात्र नुकंतच त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे विदर्भात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

“येत्या निवडणुकांमध्ये विदर्भामध्ये शिवसेनेची पूर्ण ताकदीनिशी वाटचाल सुरू ठेवेन”, असे वक्तव्य दुष्यंत यांनी केले. तर दुष्यंत चतुर्वेदींना योग्य ते पद दिले जाईल असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात. मात्र आता राजकीय कारकीर्दीची सुरुवात ते करणार आहेत. वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. मोठा राजकीय वारसा असलेल्या माजी मंत्र्याच्या मुलाला पक्षात घेऊन शिवसेनेकडून विदर्भात आणखी जम बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेसाठी शिवसेना सध्या विभागनिहाय तयारी करत आहे.

दरम्यान वडील सतीष चतुर्वेदी यांचंही काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी जमत नसल्याचं चित्र आहे. पण आपण कधीही काँग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी गेल्यावर्षी स्पष्ट केलं होतं.

तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि सतीष चतुर्वेदी यांचे संबंध चांगले नाहीत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होताच मला मंत्रिमंडळातून काढल्याचंही ते एकदा म्हणाले होते. विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे. 10 वर्षे मंत्रिपदाचा अनुभव घेतल्यामुळे तळागाळापर्यंत त्यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

वडील 25 वर्ष आमदार, 10 वर्ष कॅबिनेट मंत्री, मुलगा शिवसेनेत प्रवेश करणार


Published On - 7:22 pm, Sun, 23 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI