आझम खान यांना 72 तास, तर मनेका गांधींना 48 तास प्रचारबंदी

आझम खान यांना 72 तास, तर मनेका गांधींना 48 तास प्रचारबंदी

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना ऐन लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारबंदी करण्यात आली आहे. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनाही आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. मनेका गांधी आणि आझम खान यांना अनुक्रमे 48 तास आणि 72 तास प्रचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ही बंदी लागू होणार आहे.

आझम खान यांच्यावर काय कारवाई?

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भर सभेत अभिनेत्री आणि भाजप उमेदवार जया प्रदा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावेळी जाहीर सभेत जया प्रदा यांना उद्देशून ”तुम्हाला ओळखायला ज्यांना 17 वर्षे लागली. त्यांना मी १७ दिवसांतच ओळखलं होतं. त्यांची अंतर्वस्त्र ही खाकी आहेत,” असे वक्तव्य आझम खान यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन आझम खान यांना नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्याशिवाय आझम खान यांना महिला आयोगाने नोटीसही पाठवली होती.

त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने जया प्रदा यांच्यावरील टीका गांभीर्याने घेत आझम खान यांना प्रचारबंदी लागू केली आहे. यानुसार आझम खान यांच्या प्रचार मोहिमेवर उद्या (16 एप्रिल) सकाळी 10 वाजल्यापासून बंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पुढील 72 तास निवडणूक प्रचार, रोड शो किंवा इंटरव्ह्यू असे निवडणुकीच्या प्रचाराशी संबधित कोणत्याही गोष्टीत आझम खान सहभागी होऊ शकत नाहीत.

तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सुल्तानपूरमधील एका प्रचारसभेत मुस्लीम समाजाला उद्देशून आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केलं होत. मी यंदाची लोकसभा निवडणूक जिंकणार आहे. पण मुस्लिमांनी मला मत दिलं नाही आणि नंतर ते माझ्याकडे काम मागायला आले तर स्वाभाविक आहे की मी त्यांना नोकरी द्यायचा की नाही याचा विचार करेन.” असे धक्कादायक विधान मनेका गांधी यांनी केले होते.

या विधानानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. मनेका गांधी यांच्या प्रचारमोहिमेवर उद्या (16 एप्रिल) सकाळी 10 वाजल्यापासून बंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पुढील 48 तास निवडणूक प्रचार, रोड शो किंवा इंटरव्ह्यू असे निवडणुकीच्या प्रचाराशी संबधित कोणत्याही गोष्टीत मनेका गांधी सहभागी होऊ शकणार नाहीत.

दरम्यान काही तासांपूर्वीच मायावती यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 48 तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. तर योगी आदित्यनाथ यांच्यावरही उद्यापासून (मंगळवार) 72 तास निवडणूक प्रचारबंदी करण्यात येणार आहे

मायावती यांनी 7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील देवबंद येथील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य करुन, आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता, तर योगी आदित्यनाथ यांनी 9 एप्रिल रोजी मेरठ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी पार पडलं. दुसरा टप्पा 18 एप्रिल रोजी होणार आहे. तत्पूर्वीच उत्तर प्रदेशातील दोन दिग्गज नेत्यांच्या म्हणजेच योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत, इतर राजकीय पक्षांनाही इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या: 

योगींना 72 तास, तर मायवतींना 48 तास प्रचारबंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI