मोदींविरोधात दंड थोपटणाऱ्या तेज बहादुर यांची उमेदवारी धोक्यात?

वाराणसी: सैन्यात मिळणाऱ्या निकृष्ठ दर्जाचा मुद्दा उपस्थित करणारे सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या तेज बहादुर यादव यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहादुर यांना त्यांच्यावरील सैन्यातील कारवाई आणि उमेदवारी अर्जावर अनेक प्रश्न विचारले आहेत. तेज बहादुर यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी …

मोदींविरोधात दंड थोपटणाऱ्या तेज बहादुर यांची उमेदवारी धोक्यात?

वाराणसी: सैन्यात मिळणाऱ्या निकृष्ठ दर्जाचा मुद्दा उपस्थित करणारे सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या तेज बहादुर यादव यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहादुर यांना त्यांच्यावरील सैन्यातील कारवाई आणि उमेदवारी अर्जावर अनेक प्रश्न विचारले आहेत.

तेज बहादुर यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी पहिला उमेदवारी अर्ज 24 एप्रिलला अपक्ष म्हणून भरला, तर दुसरा उमेदवारी अर्ज समाजवादी पक्षाच्यावतीने काल (29 एप्रिल रोजी) दाखल केला. याबाबतही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला आहे. तेज बहादुर यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांना बीएसएफमधून काढून टाकण्याचे कारणही विचारले. निवडणूक लढण्यासाठी यादव यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे की नाही? याचीही विचारणा या नोटीसमध्ये केली आहे. तसेच परवानगी घेतली नसल्यास उद्या (1 मे) सकाळी 10 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाची परवानगी आणण्यास सांगितले. आयोगाची परवानगी न आणल्यास तेज बहादुर यांचा उमेदवारी अर्ज रद्दही केला जाऊ शकतो.

सैन्यातील निकृष्ठ जेवणाच्या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर तेज बहादुर चर्चेत

तेज बहादुर यादव यांनी 2 वर्षांपूर्वी सैन्यात मिळणाऱ्या निकृष्ठ जेवणाच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. सैन्यात कामावर असताना मिळणाऱ्या जेवणाबाबत बोलतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी जेवणाच्या दर्जाला वरिष्ठ अधिकारी कसे जबाबदार आहेत हेही सांगितले होते. त्यानंतर ते चर्चेत आले.

शिस्तभंग केल्याच्या आरोपाखाली यादव यांना बीएसएफमधून काढले

दरम्यान, हा व्हिडीओ करण्याअगोदर त्यांनी जेवणाच्या दर्जाबाबत गृह मंत्रालयातही तक्रार केली होती. मात्र, त्यावर काहीही कारवाई न केल्याने अखेर यादव यांनी संबंधित व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सैन्यापासून सर्व सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सैन्याने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि शिस्तभंग केल्याच्या आरोपाखाली यादव यांना बीएसएफमधून काढून टाकण्यात आले.

पंतप्रधान मोदी सैन्यावर केवळ बोलतात, काम करत नाही

तेज बहादुर यादव यांनी पंतप्रधान मोदींवर सैन्यावर केवळ भाषण करण्याचा आणि कोणतेही काम न करण्याचा आरोप केला. तसेच मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *